महापालिकेच्या नगररचना विभागाला हाताशी धरून ऑफलाईन पद्धतीने मनमानीरित्या बांधकामांचा नकाशा मंजूर करणे, अतिरिक्त बांधकामांना मंजुरी मिळवून देणे व याबदल्यात संबंधित बांधकाम व्यावसायिकांजवळून लाखाे रुपयांची रक्कम वसूल करण्याचा जणू गाेरखधंदाच काही नगरसेवकांनी सुरू केल्याची परिस्थिती आहे. याकरीता नगररचना विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. हद्दवाढ क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या कापड बाजारचे ले-आऊट नियमांना धाब्यावर बसवून मंजूर करण्यात आले. यासह हद्दवाढ क्षेत्रातील अशा कितीतरी वाणिज्य संकुलांचे नकाशे मंजूर करताना नगररचना विभागांचे नियम अक्षरश: पायदळी तुडविण्यात आल्याची परिस्थिती आहे. या सर्व अर्थकारणात काेट्यवधी रुपयांची उलाढाल करण्यात आली आहे. यातील काही बांधकाम नकाशे आयुक्त संजय कापडणीस यांच्या मंजुरीसाठी प्रलंबित असून काही इमारतींसाठी ‘बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र’(कम्पिल्शियन सर्टिफिकेट)मिळावे, याकरीता मनपातील काही पदाधिकाऱ्यांकडून जीवाचा आटापिटा केला जात असल्याची माहिती आहे.
आयुक्तांच्या निवासस्थानी गर्दी
नगररचनाचे सर्व निकष,नियम धाब्यावर बसवत काही बड्या बिल्डरांनी सादर केलेल्या बांधकाम परवानगीच्या फायली मंजूर करून देण्यासाठी अग्रीम रकमेची उचल करणाऱ्या काही पदाधिकारी व नगरसेवकांची आयुक्त संजय कापडणीस यांच्या बदलीमुळे चांगलीच गाेची झाली आहे. बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळपासूनच आयुक्तांच्या निवासस्थानी धाव घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांसह बांधकाम व्यावसायिक व कंत्राटदारांना आयुक्तांमार्फत स्पष्ट शब्दांत नकार देण्यात आल्याची माहिती आहे.
निमा अराेरा साेमवारी स्वीकारणार पदभार
राज्य शासनाने मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती केलेल्या ‘आयएएस’ निमा अराेरा ८ फेब्रुवारीला महापालिकेत दाखल हाेणार आहेत. साेमवारपासूनच त्या प्रशासकीय कामकाजाला सुरुवात करणार असल्याची माहिती आहे.