अकोला : रेल्वे मंत्रालयाने विद्यार्थ्यांना दिली जाणारी ५0 टक्के भाड्याची सलवत बंद करण्याचा निर्णय घेतल्याने, विद्यार्थ्यांना सहलीला जाताना पूर्ण भाडे भरावे लागणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना झुकझूक गाडीची सहल महागात पडणार आहे. रेल्वे प्रशासनाच्यावतीने प्रवाशांना विविध सुविधा देण्यात येतात. यात विद्यार्थ्यांसाठीदेखील काही सुविधा आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहलीकरिता विविध ठिकाणी जातात. या विद्यार्थ्यांना सहलीसाठी किंवा अभ्यास दौर्यासाठी रेल्वेकडून सवलत देण्यात येते. त्यानुसार ईच्छित प्रवासासाठी एकूण भाड्याच्या ५0 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना रेल्वेचा प्रवास करता येतो. कमी भाड्यात सुखकर आणि सुरक्षित प्रवास म्हणून या योजनेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. आता ही सुविधा बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी सवलत योजना बंद करतानाच, बुकींगसाठी असणार्या स्वतंत्र खिडक्यादेखील बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँन्ड टुरिझम (आयआरसीटीसी) तर्फे विद्यार्थ्यांना सवलत अर्ज दिले जात होते. ते अर्ज भरुन तिकीट काढण्यासाठी मोठय़ा रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र खिडक्या होत्या. आता सवलतीसोबतच या स्वतंत्र खिडक्यादेखील बंद केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठीची सवलत योजना बंद झाल्याचे कोणतेही आदेश अद्याप आमच्यापर्यंत आलेले नाहीत. विभागीय कार्यालयाकडे अर्ज देवून विद्यार्थी अभ्यास दौर्यासाठी सवलत योजनेचा लाभ मिळवू शकतात, असे अकोला रेल्वे स्थानकाचे आरक्षण पर्यवेक्षक शिवराम कमल यांनी स्पष्ट केले.
रेल्वेची सहल विद्यार्थ्यांना पडणार महागात!
By admin | Updated: October 29, 2014 01:44 IST