वाशिम : राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत पुणे विभागाच्या तब्बल ९ खेळाडूंनी विजयश्री खेचून आणत वाशिम येथील राज्यस्तरीय स्पर्धा गाजविल्या. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने आयोजित १४ वर्षे वयोगटातील (मुले/मुली) राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलावर पार पडल्या. या स्पर्धेत प्रत्येक विभागाचे आठ मुले आणि आठ मुली असे आठ विभागातून एकूण १४४ खेळाडू सहभागी झाले होते. अंतिम सामने पुणे विभागातून खेळाडूंनी गाजविले. या विभागातील तब्बल नऊ खेळाडूंनी विजय मिळविला आहे. त्याखालोखाल अमरावती विभागातील चार खेळाडूंनी विजय मिळविला. १४ वर्षे वयोगटातील इंडियन बॉईज या प्रकारात प्रथम क्रमांक सुमेध मोहोड (अमरावती विभाग), द्वितीय किशोरकुमार सुर्वे (पुणे विभाग), तृतिय ऋतिक सोळंके (अमरावती) तर चतुर्थ क्रमांक अजिंक्य भगत (पुणे) याने प्राप्त केला. १४ वर्षे वयोगटातील इंडियन गर्ल्स् या प्रकारात प्रथम लक्ष्मी दारवंटे (पुणे), द्वितीय मधुरा देशमुख (पुणे), तृतिय अश्विनी कोल्हे (अमरावती) तर चतुर्थ क्रमांक साक्षी तोटे (अमरावती) हिचा आला. १४ वर्षे वयोगटातील बॉईज रिकव्हर या प्रकारात प्रथम मार्तंड येरले (लातूर), द्वितीय प्रथमेश गिर्हे, तृतिय गौरव मगर (पुणे), चतुर्थ संदेश संचेती (पुणे) तर मुलींच्या गटातून प्रथम समृद्धी वामन (पुणे), द्वितीय वेदांशी चांदुरकर (अमरावती), तृतिय केतकी जाधव (मुंबई), चतुर्थ दिक्षा संचेती (पुणे) अशी विजेत्या खेळाडूंची नावे आहेत.
राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत पुणे विभागाच्या संघाचा दबदबा
By admin | Updated: October 22, 2014 00:33 IST