अकोला: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत सोमवारी सायंकाळी ६ वाजता संपुष्टात आली. त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या जिल्हय़ातील पाच मतदारसंघात उमेदवारांच्या प्रचारार्थ १३ दिवसांपासून धडाडणार्या प्रचार तोफा थंडावल्या. जाहीर प्रचार संपल्याने, आता मतदारसंघारातील घरोघरी मतदारांशी संपर्क साधून, गुपचूप प्रचारावर उमेदवारांकडून भर दिला जात आहे.विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्हय़ातील आकोट, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच मतदारसंघात एकूण ९३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये आकोट मतदारसंघात १८, बाळापूर मतदारसंघात १६, अकोला पश्चिम मतदारसंघात १५, अकोला पूर्व मतदारसंघात २५ आणि मूर्तिजापूर मतदारसंघात १९ उमेदवारांचा समावेश आहे. पाचही मतदारसंघात प्रामुख्याने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बसपा व इतर राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. पाचही मतदारसंघात उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ गेल्या १३ दिवसांत उमेदवारांसह सर्मथक कार्यकर्त्यांंनी मतदारसंघ पिंजून काढीत मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. तसेच विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी छोट्या-मोठय़ा सभा घेऊन, मतदारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. निवडणुकीचा जाहीर प्रचार संपुष्टात आल्याने, सोमवारी सायंकाळपासून उमेदवारांसह कार्यकर्त्यांंनी मतदारसंघातील घरोघरी मतदारांशी संपर्क साधून, गुपचूप प्रचार करण्यावर भर दिला आहे.
प्रचार तोफा थंडावल्या
By admin | Updated: October 14, 2014 01:40 IST