अकोला : मान्सून लांबल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, येत्या काही दिवसात सार्वत्रिक दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार पुढील तीन महिन्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात १७३ गावांसाठी २0६ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याची स्थिती आहे. आणखी काही दिवस सार्वत्रिक दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने, पाणीटंचाई निवारणासाठी ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी जिल्हापरिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तहसीलदार व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांमार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा शुक्रवार,१८ जुलै रोजी तयार करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील १७३ गावांमधील पाणीटंचाई निवारणासाठी २0६ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. उपाययोजनांसाठी २ कोटी २९ लाख ५५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार
By admin | Updated: July 19, 2014 01:32 IST