बोरगाव वैराळे/उरळ : गरोदर असलेल्या विवाहितेला पेटवून दिल्याची घटना रविवारी पहाटे बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे येथे घडली. या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी विवाहितेचा सासरा व पतीला अटक केली आहे. अलका शुद्धोधन डोंगरे हे विवाहितेचे नाव आहे. रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास डोंगरे यांच्या घरात भांडी पडल्याचा आवाज झाला. त्यामुळे अलका डोंगरे हिच्याशी सासरा गोवर्धन सम्राट डोंगरे, सासू पंचफुला डोंगरे आणि पती शुद्धोधन डोंगरे यांनी वाद घातला. काही वेळेतच वाद विकोपाला गेला. तिघांनी अलकावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी बोरगाव वैराळ येथे धाव घेऊन पंचनामा केला. अलकाला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. ती ९७ टक्के भाजली. या प्रकरणी पोलिसांनी अलकाचा जबाब नोंदविला. उपरोक्त घटनाक्रम अलकाने विशद केल्यानंतर पोलिसांनी पंचफुला डोंगरे, गोवर्धन डोंगरे आणि शुद्धोधन डोंगरेविरुद्ध भादंविचे कलम ३0७ (प्राणघातक हल्ला), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार काटकर, उपनिरीक्षक आर.के. साठवणे व श्रीधर डांगे करीत आहेत.
गरोदर विवाहितेला पेटविले; दोघांना अटक
By admin | Updated: September 7, 2015 01:46 IST