अकोला: शहरातील बेताल वाहतूक आणि रस्त्यावरील खड्डय़ांनी एका चिमुकल्याला बुधवारी प्राणास मुकावे लागले. अशोक वाटिका चौकात दुपारी ट्रकने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील अडीच वर्षांच्या चिमुकला जागीच ठार झाला तर त्याची आजी आणि काका गंभीर जखमी झाले. कपड्यांची खरेदी करून घरी जात असताना, मोटारसायकलला भरधाव ट्रकने धडक दिली. यात मोटारसायकलवरील अडीच वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाला तर त्याचे आजी व काका गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास अशोक वाटिका चौकातील पेट्राल पंपाच्या कॉर्नरवर घडली. पावसाळे लेआऊटमधील गजानननगरात राहणारे भिकाजी महादेव उजाडे (४२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा पुतण्या डॉ. योगेश हरिश्चंद्र उजाडे (३४) हा बुधवारी दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास त्याची आई मथुराबाई हरिश्चंद्र उजाडे आणि त्याच्या मोठय़ा भावाचा मुलगा श्री ऊर्फ अथर्व नितीन उजाडे (२ वर्ष ६ महिने) यांना घेऊन एमएच ३0 एडी ९७७६ क्रमांकाच्या मोटारसायकलने कपडे खरेदी करण्यासाठी गेला होता. कपड्यांची खरेदी केल्यानंतर तो आई व चिमुकल्या पुतण्यास घेऊन न्यू खेताननगरातील घरी जाण्यास निघाला. अशोक वाटिका चौकात सिग्नल मिळाल्यावर योगेश पुढे जात असताना पेट्रोलपंपाकडील मार्गाने भरधाव येणार्या एमएच ३0 एबी २३0९ क्रमांकाच्या या ट्रकने मोटारसायकला धडक लागली. त्यामुळे योगेशचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. रस्त्यावरील खड्डय़ांमधून त्याची मोटारसायकल उसळली आणि तिघेही जण खाली कोसळले. यात चिमुकला अथर्व ट्रकच्या चाकाखाली आल्याने, त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. योगेश व मथुराबाई गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. खदान पोलिसांनी ट्रकचालकास अटक करून त्यास ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बेताल वाहतूक अन् खड्डय़ांनी घेतला चिमुकल्याचा बळी
By admin | Updated: February 19, 2015 02:13 IST