अकोला: शहरात आठ सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करणार्या प्रतिभा कन्स्ट्रक्शन कंपनीचा महापालिकेच्या विरोधातील ३0 कोटींचा दावा फेटाळून लावत उलटपक्षी 'प्रतिभा'नेच मनपाला १0 कोटी रुपये तातडीने अदा करण्याचा आदेश गुरुवारी आर.बी. ट्रेडर्स लवादाने दिला. या निर्णयामुळे मनपाचा जीव भांड्यात पडला असून, प्रशासनाच्या कायदेशीर लढाईचा हा महत्त्वपूर्ण विजय मानल्या जात आहे.भाजप-शिवसेना युतीच्या कालावधीत शहरात पहिल्यांदा १६ कोटी रुपयांतून सिमेंट काँक्रिटचे १६ रस्ते तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिकेने निविदा प्रक्रियेनुसार प्रतिभा कन्स्ट्रक्शन कंपनीला वर्कऑर्डर जारी केली. प्रतिभाने सुमारे ४५ किलोमीटर अंतराचे रस्ते तयार करणे अपेक्षित होते. तसे न होता, कंपनीने सिमेंटचे १२ रस्ते तेही अर्धवट स्थितीत तयार केले. प्रशासनाने जाब विचारल्यानंतर कंपनीने अकोल्यातून काढता पाय घेतला. एवढय़ावरच न थांबता कंपनीने मनपाच्या विरोधात नुकसान भरपाईपोटी तब्बल १६ कोटींचा दावा दाखल केला. व्याजासह ही रक्कम ३२ कोटींच्या आसपास होती. मनपा प्रशासनानेसुद्धा कंपनीच्या विरोधात १९ कोटींचा दावा दाखल केला. यामध्ये कंपनीने करारानुसार रस्त्यांची कामे पूर्ण न केल्याचे नमूद करण्यात आले होते. रस्त्यांची अर्धवट कामे सोडून कंपनीने हात झटकल्याचे मनपाने स्पष्ट केले. तीन सदस्यीय आर.बी. ट्रेडर्स लवादाकडे सुरू असलेल्या या प्रकरणाचा आठ वर्षांनंतर सोक्षमोक्ष लागला. या आठ वर्षांंत ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल, हरीष आलीमचंदानी यांच्यासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर यांची अनेकदा सुनावणी घेण्यात आली. बांधकाम विभागाने सादर केलेल्या दस्तावेजाचे अवलोकन केल्यानंतर अखेर आर.बी. ट्रेडर्स लवादाने प्रतिभा कन्स्ट्रक्शन कंपनीचा दावा फेटाळून लावत उलटपक्षी मनपाला दहा कोटी ४८ लाख रुपये अदा करण्याचे आदेश दिले आहेत. पैसे अदा करण्यास विलंब झाल्यास २१ टक्के व्याज लागू करण्यात आले.
‘प्रतिभा’चा दावा फेटाळला; मनपाला १0 कोटी द्या
By admin | Updated: April 1, 2016 00:49 IST