अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र सपकाळ यांनी धनादेश अनादर केल्याप्रकरणी मुंबई व नाशिक न्यायालयात तीन वेगवेगळ्य़ा प्रकरणात त्यांच्याविरोधात खटले दाखल असून, ही माहिती त्यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर केलेल्या शपथपत्रातून दडवल्याची तक्रार बुधवारी राजकुमार तुलशान यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे केली. विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रवींद्र सपकाळ यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यांचा सामना शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासोबत होत आहे. येत्या २७ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. नाशिकमध्ये शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले रवींद्र सपकाळ यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे शपथपत्र सादर केले. सपकाळ यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून त्यांच्यावर धनादेश अनादरप्रकरणी दाखल खटल्यांची माहिती दडवल्याची तक्रार, २३ डिसेंबर रोजी राजकुमार तुलशान यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे केली. धनादेश अनादरप्रकरणी मुंबई न्यायालयात त्यांच्याविरूद्ध दोन खटले प्रलंबित असून, त्यावर १६ डिसेंबर रोजी सुनावणी झाली. तर नाशिक न्यायालयात दाखल खटल्याची सुनावणी येत्या ३0 डिसेंबर रोजी होणार आहे. २0१३ ते २0१५ या दोन वर्षांत त्यांच्यावर धनादेश अनादर होण्याची तीन प्रकरणे दाखल झाल्यानंतरही सपकाळ यांनी सदर माहिती शपथपत्रातून दडवल्याची तक्रार तुलशान यांनी केली आहे. या प्रकरणी सपकाळ यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी तुलशान यांनी या तक्रारीद्वारे केली आहे. यासंदर्भात रवींद्र सपकाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात विचारणा शपथपत्र सादर करताना निवडणूक निर्णय अधिकार्यांना केली असल्याचे सांगीतले. त्यांनी आवश्यकता नसल्याचे सुचित केल्यामुळे उपरोक्त माहिती नमूद केली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
सपकाळ यांनी दडविले धनादेश अनादराचे खटले!
By admin | Updated: December 24, 2015 02:55 IST