अकोला : महापालिका हद्दवाढीच्या मुद्यावर राज्य शासनाने पुन्हा सकारात्मक संकेत दिले आहेत. महापालिका क्षेत्रात समाविष्ट होणार्या संभाव्य व प्रस्तावित गावांची माहिती सादर करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. त्या स्वरूपाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अकोला शहराची लोकसंख्या व र्मयादित भौगोलिक क्षेत्रफळ लक्षात घेता मनपा क्षेत्राची हद्दवाढ करणे गरजेचे झाले आहे. मनपाच्यावतीने पुरविल्या जाणार्या मूलभूत सोयी-सुविधांवर शहरालगतच्या गावांचा ताण पडत आहे. रस्ते, पथदिवे, पाणी आदी सुविधांचा लाभ शहरालगतचे नागरिक घेत आहेत. शिवाय शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ व जमिनींचे आकाशाला भिडलेले दर पाहता, मनपाची हद्दवाढ आवश्यक आहे. या विषयावर आजपर्यंंत आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी किमान सात ते आठ वेळा अधिवेशनात लक्षवेधीद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी अकोला जिल्हय़ातील बाळापूर नगर परिषदेची हद्दवाढ झाली असून, मनपा हद्दवाढीच्या प्रस्तावाबाबत जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. हा अहवाल प्राप्त होताच त्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट उत्तर मुख्यमंत्र्यांनी आ. बाजोरिया यांना दिले होते. या अधिवेशनात आ. बाजोरिया यांनी प्रश्न उपस्थित करीत शासनाला पुन्हा जाणीव करून दिली. बाजोरियांच्या प्रश्नावर शासनाने अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ातील शहरांच्या हद्दवाढीसंदर्भात संबंधित जिल्हा प्रशासनाला व मनपाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. मनपाने पाठवलेल्या प्रस्तावावर शासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.
अकोला महापालिका हद्दवाढीचे सकारात्मक संकेत
By admin | Updated: June 15, 2014 22:22 IST