लोकमत न्युज नेटवर्कअकोला : सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याकरिता राज्य शासनाने २0 कोटी रुपये कृषी विद्यापीठांना देण्याचा निर्णय घेतला आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेतीवर सुरू असलेल्या प्रकल्प तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या बळकटीकरणासाठी कृषी विद्यापीठाला अनुदान मिळावे, यासाठी ‘लोकमत’ने चार वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती प्रकल्प सुरू असून, राज्यातील पहिला सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम येथे सुरू करण्यात आला होता; परंतु कृषी विद्यापीठाकडे पैसा नसल्याने हा अभ्यासक्रम तात्पुरता बंद करण्यात आला होता. यावर्षी पुन्हा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या असताना, शासनाने पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने सेंद्रिय पदविका अभ्यासक्रम तसेच सेंद्रिय संशोधन केंद्र बळकटीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने २0१३ मध्ये यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. शिवाय तत्क ालीन कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव डॉ. सुधीर गोयल व कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी या प्रस्तावाला हिरवी झेंडी दिली होती. तसेच पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंबंधी परिपत्रकही काढण्यात आले होते. तेव्हापासून या कृषी विद्यापीठाला निधीची प्रतीक्षा होती. दरम्यान, शासनाने एका कृषी विद्यापीठाला पाच कोटी देण्याऐवजी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांकडून यासंदर्भातील प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेतला. तसे प्रस्तावही मागवून घेतले होते. त्यानंतर चारही कृषी विद्यापीठांना प्रत्येकी पाच कोटी याप्रमाणे २0 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अनुदानातून चारही कृषी विद्यापीठात सेंद्रिय संशोधन केंद्र तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या धर्तीवर सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
आमच्याकडे सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम सुरू असून, सेंद्रिय शेती प्रकल्प सुरू आहे. यासाठीच पाच वर्षांपूर्वी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शासनाने आता मान्यता दिली असून, राज्यातील चारही कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती संशोधन केंद्र सुरू होऊन सेंद्रिय शेती विकासाला चालना मिळेल.डॉ. व्ही.एम. भाले, अधिष्ठाता कृषी,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.