अकोला - बाळापूर तालुक्यातील शेळद शिवारातील शेतात झोपलेल्या शेतकर्याकडील सुमारे ५0 हजार रुपयांचा ऐवज लुटणार्या सहा जणांच्या टोळीतील एका आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. सावदेकर यांच्या न्यायालयाने मंगळवारी एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच २00 रुपये दंड ठोठावण्यात आला असून, सबळ पुरावे नसल्याने टोळीतील दोघांना निर्दोष सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.वाशिम जिल्ह्यातील घोडेगाव येथील रहिवासी विनोद विश्वनाथ ऐकाडे यांचे बाळापूर तालुक्यातील शेळद येथे शेत आहे. २३ मे २0१३ रोजी विनोद ऐकाडे आपल्या शेतात मुक्कामी असतांना सहा जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने त्यांच्या शेतात घुसून त्यांना मारहाण केली. यावेळी ऐकाडे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख सात हजार रुपये असा एकूण ४९ हजार ७00 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३९५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास काही दिवसांनीच स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने दरोड्यातील सहा आरोपींना अटक केली. यामध्ये आकाश प्रकाश पवार, धर्मा प्रकाश पवार, राजू ऊर्फ बबलू सेनपट शिंदे, राजा सोनू भोसले, विजय सोनू भोसले आणि प्रभू देवका भोसले यांचा समावेश आहे. यामधील राजू शिंदे, राजा भोसले, विजय भोसले यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. सावदेकर यांच्या न्यायालयात झाली असून, यामध्ये आकाश प्रकाश पवार याच्याविरुद्ध मिळालेल्या ठोस पुराव्यांवरून त्याला एक वर्षाचा कारावास व २00 रुपये दंड ठोठावण्यात आला. आरोप करण्यात आलेले धर्मा पवार आणि प्रभु भोसले यांच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने त्यांना निर्दोष सोडण्यात आले आहे.
दरोड्यातील आरोपीस एक वर्षाची शिक्षा
By admin | Updated: December 10, 2014 01:23 IST