कनेरगाव नाका (जि. वाशिम): कनेरगाव-वाशिम सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावर जीप व मोटारसायकल अपघातात एक जण ठार व एक जण जखमी झाल्याची घटना ११ नोव्हेंबर दीपावलीच्या दिवशी घडली. पैनगंगा नदीच्या पुलावरून वाशिमकडून येणारी मोटारसायकल एम.एच. ३0 - ३७ - ६२३५ व कनेरगाव येथून वाशिमकडे जाणारी महिद्रा पिकअपचा समोरा समोर अपघात झाला. यामध्ये मोटारसायकलवरील वाशिम जिल्हय़ातील सुकळी येथील राजू प्रल्हाद खडसे हा ३५ वर्षीय युवक ठार झाला तर मधुकर ग्यानुजी खडसे गंभीर जखमी झाले आहेत. मधुकर खडसे व राजू खडसे वाशिमकडे जात असताना महिंद्रा पिकअप गाडीचा अपघात झाल्याने दोघेही रस्त्यावर पडले. पादचार्यांनी त्यांना ताबडतोब वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता राजू यास मृत घोषित करण्यात आले. अपघातातील महिंद्रा पिकअप हे वाहन नांदेड येथील सिमला फ्रुट कंपनी येथील असल्याची माहिती आहे. हे वाहन नांदेड येथून पपई घेऊन वाशिमकडे जात होते. अपघात घडल्याबरोबर गाडीचा चालक व क्लिनर दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. सदर घटनेची माहिती कनेरगाव पोलीस चौकीला मिळाल्याबरोबर पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली.
जीप-मोटारसायकल अपघातात एक ठार
By admin | Updated: November 13, 2015 01:59 IST