अकोला : हॉटेलमध्ये व परिसरात अस्वच्छता ठेवणे शहरातील व्यावसायिकांच्या अंगलट येत आहे. मनपाच्या गंगाजळीत वाढ करण्याच्या उद्देशातून प्रशासनाने अशा हॉटेल व्यावसायीकांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली. सोमवारी हॉटेल व्यावसायिकांजवळून तब्बल ५ लाख ९५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.हॉटेल, बार-रेस्टॉरन्टसह शहरात मोठ्या प्रमाणावर खाणावळी आहेत. ग्राहकांना शुद्धतेची हमी देण्यासोबतच स्वच्छतेचे निकष पाळणे गरजेचे आहे. मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी परिसर अस्वच्छ करणार्या अशा हॉटेल व्यावसायिकांविरोधात कारवाईचा दंडुका उगारला आहे. शिवाय प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असतानादेखील बाजारात व हॉटेलमध्ये सर्रासपणे पिशव्यांचा वापर होत आहे. त्यानुषंगाने शहरातील चारही झोनमध्ये आरोग्य विभागाच्यावतीने हॉटेलसह संबंधित व्यावसायिकांच्या दुकानांची झाडाझडती सुरू आहे. सोमवारी राठी पेडेवाला यांना १ लाख रुपये, रेल्वे स्टेशन चौकातील जयंत उपाहारगृह १ लाख, इन्कमटॅक्स चौकस्थित वैभव हॉटेल दीड लाख, श्रीहरी रेस्टॉरन्ट ५० हजार, गोरक्षण रोडस्थित गुजराती स्वीटमार्ट, गुप्ता फ्रुट १० हजार रुपये, शिवार्पण हॉटेल १० हजार, तसेच लक्ष्मी ट्रेडर्स २५ हजार रुपये व सुभाष चौकातील जैन बॅटरी संचालकाला १ लाख रुपयांचा दंड आकारून तो वसूल करण्यात आला.
हॉटेल व्यावसायिकांवर मनपाची वक्रदृष्टी अस्वच्छता भोवली; ५ लाख ९५ हजारांचा दंड वसूल
By admin | Updated: July 15, 2014 00:39 IST