अकोला: पहिल्या दिवशीचे विसर्जन शांततेत आटोपल्यानंतर दुसर्या दिवशीच्या गणेश विसर्जनाला मात्र गालबोट लागले. गणेश विसर्जनासाठी गेलेला जठारपेठेतील २८ वर्षीय युवक पूर्णेच्या पुरात वाहून गेल्याची घटना मंगळवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. बेपत्ता झालेल्या युवकाचा उशिरा रात्रीपर्यंत शोध सुरू होता. जठारपेठ भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात राहणारा मनोज ऊर्फ पिंट्या प्रवीण उके (२८) हा दिवेकर आखाड्याजवळील आदर्श गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी मंगळवारी दुपारी गांधीग्रामला गेला. गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मनोज उके याला नदीमध्ये अंघोळ करण्याचा मोह आवरला नाही आणि गांधीग्रामच्या पुलावरून खळाळत्या पाण्यामध्ये उडी घेतली; परंतु तो बराच वेळपर्यंत बाहेर न आल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांना शंका आली. त्यांनी आरडाओरड सुरू केल्याने परिसरातील नागरिक धावून आले. गावातील काही युवकांनी नदीमध्ये उडी घेत, मनोजला शोधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत मनोजचा शोध घेणे सुरू होते. * आकोटात खाई नदीत बुडून एकाचा मृत्यू आकोट शहरातून वाहणार्या खाई नदीमध्ये एका भूमिहीन शेतमजुराचा नदीच्या पुरात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या दरम्यान घडली. पोपटखेड धरणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणाचे दरवाजे काही प्रमाणात उघडण्यात आले. त्यामुळे खाई नदीला पूर आला आहे. दरम्यान मोठे बारगण-गुजर प्लॉट येथील रहिवासी संतोष रामदास कपले (२२) हे दुपारी खाईनदीच्या काठावर गेले होते. पाय घसरून नदीच्या पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
अकोला जिल्ह्यात दुसर्या दिवशीच्या विसर्जनाला गालबोट
By admin | Updated: September 10, 2014 01:41 IST