लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरणच्या सर्वच प्रकारच्या ग्राहकांवरील थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. विजेचा वापर करूनही त्यापोटी येणारे बिल न भरण्याकडे वीज ग्राहकांचा कल वाढल्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती खालावली आहे. थकबाकीदार ग्राहकांकडून वीज बिल वसूल करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर अशा ग्राहकांची नावे आता स्थानिक वृत्तपत्रांमधून प्रकाशित करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यानुसार जिल्हय़ातील दहा मोठय़ा थकबाकीदारांची नावे यापुढे दर महिन्याला स्थानिक वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामध्ये घरगुती, वाणिज्य व औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांचा समावेश असणार आहे. आपण वापरलेल्या विजेच्या वापराचे वीज बिल भरणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य असूनदेखील बरेच ग्राहक आपली पत, आपली ओळख, आपल्या शक्तीचा गैरवापर करून वीज बिल विनाकारण थकीत ठेवतात. महावितरणचे जनमित्र कर्मचारी हे वारंवार थकीत ग्राहकांकडे चकरा मारूनदेखील जे ग्राहक वीज बिल भरणा वेळेत करीत नाही, जे आडमुठेपणा घेतात, त्यांची नावे आता स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यामुळे थकीत वीज बिल ठेवणार्यांची आता खैर नाही. या निर्णयानुसार आता दर महिन्याच्या २५ तारखेपर्यंत दहा मोठय़ा थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रांमधून छापण्यात येणार आहे. सदर यादीत १000 रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांचाच समावेश राहणार असून, एकदा प्रसिद्ध झालेले नाव पुन्हा प्रकाशित होणार नाही. ज्या ग्राहकांनी चुकीच्या आलेल्या बिलामुळे आपले वीज बिल भरले नाही, त्यांनी संबंधित महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित संपर्क साधून वीज बिल दुरुस्त करून घ्यावे.
अंमलबजावणी सुरुथकबाकीदारांची नावे स्थानिक वृत्तपत्रांमधून प्रकाशीत करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी या महिन्यापासून सुरु झाली आहे. चालू महिन्यापर्यंत मोठी रक्कम थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची नावे वृत्तपत्रांमध्ये जाहीर करण्यात आली आहेत.
थकबाकीदार ग्राहकांची नावे वृत्तपत्रातून प्रसिद्ध करणे हा हेतू महावितरणचा नाही; परंतु जे ग्राहक वारंवार आपले वीज बिल थकीत ठेवतात, कर्मचार्यांना प्रतिसाद देत नाही, अशा ग्राहकांची ही सवय मोडावी, या हेतूने सदर योजना राबविण्यात येत आहे. - देवेंद्र उंबरकर, कार्यकारी अभियंता, अकोला ग्रामीण विभाग, अकोला.