अकोला, दि. २३: औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) नागार्जुना अँग्रीकेम कंपनीत सापडलेल्या एक लाख ५८ हजारांच्या अनधिकृत कीटकनाशकांचा (क्लोरापायरीफॉस) साठा मंगळवारी कृषी विभागाने जप्त केला असून, कीटकनाशकाचे नमुने तपासणी घेण्यात आले आहेत. या कंपनीवर पुढील कारवाई करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी बुधवारी न्यायालयात धाव घेणार आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये हैद्राबाद येथील नागार्जुना कीटकनाशके कंपनी आहे. या कंपनीत अनधिकृत कीटकनाशके असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकार्यांना प्राप्त झाल्याने ५ ऑगस्ट रोजी अधिकार्यांनी या कंपनीवर छापा टाकला व गोदाम सील करू न कीटकनाशके विक्री आदेश काढले होते. कंपनीच्या संचालकाकडे कागदपत्रे सादर करण्यासाठी नियमानुसार आठ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. तथापि, कंपनीचे संचालक दहा दिवसांनंतरही कीटकनाशके विक्रीचा परवाना दाखवू न शकल्याने मंगळवारी कृषी विभागाच्या पथकाने जप्त केलेला २00 लिटर क्लोरापायरीफॉस कीटकनाशक साठय़ाचा पंचनामा करू न कंपनीच्या संचालकाकडे सुपूर्द नाम्यावर दिला आहे; पण साठय़ावर विक्रीची बंदी कायम आहे.याबाबत विना परवाना कीटकनाशके कायदा १९६८ कलम ३ (१) नुसार कंपनीचे मालक, संचालकांवर कारवाई अपेक्षित असल्याने कृषी विभागाचे अधिकारी बुधवारी न्यायालयात धाव घेणार आहेत. विभागीय कृषी तंत्र अधिकारी डॉ.पी.व्ही.चेडे, विभागीय गुण नियंत्रण अधिकारी मनोहर पारडे अमरावती, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक मिलिंद जंजाळ, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी पुरुषोत्तम कडू यांनी ही कारवाई केली.अनधिकृत कीटकनाशकांचा साठा व विक्री केल्याने कीटकनाशक कायद्याचे उल्लंघन झाले आहे, त्यामुळे कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात बुधवारी न्यायालयात जाणार आहोत.- डॉ. पी.व्ही. चेडे,विभागीय तंत्र अधिकारी,कृषी विभाग,अमरावती.
नागार्जुना कंपनीत अनधिकृत कीटकनाशकांचा साठा जप्त!
By admin | Updated: August 24, 2016 00:23 IST