अकोला, दि. २९- महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागासमोर चालू आर्थिक वर्षात ३५ कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट होते. यापैकी २२ कोटी रुपये वसूल झाले असले, तरी उर्वरित १३ कोटी रुपये वसूल करण्यासाठी मनपासमोर अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या दोन दिवसांत १३ कोटी रुपये वसूल करण्याचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. महापालिका प्रशासनामार्फत मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामध्ये पथदिवे, पाणीपुरवठा, साफसफाई, रस्ते-नाल्या आदी सुविधांचा समावेश आहे. मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी अर्थातच अकोलेकरांनी प्रशासनाकडे मालमत्ता कर जमा करणे भाग आहे. यावेळी मार्च महिना संपण्यास अवघा दोन दिवसांचा अवधी शिल्लक असला, तरी अकोलेकर मालमत्ता कर जमा करीत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्याचा परिणाम मूलभूत सोयी-सुविधांवर होत आहे. चालू आर्थिक वर्षात अकोलेकरांकडे ३५ कोटी रुपये मालमत्ता व पाणीपट्टी कर वसूल थकीत होता. नोटाबंदीच्या कालावधीत मनपाकडे जुन्या नोटांच्या बदल्यात मालमत्ता कर जमा करणार्यांची मोठी संख्या होती. त्यावेळी १३ कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले. उर्वरित २२ कोटी रुपये वसूल करण्यासाठी मालमत्ता कर वसुली विभागाने संपूर्ण शहरात मोहीमच उघडली. मार्च महिना संपण्यास आता केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक असताना मनपाच्या तिजोरीत २२ कोटींचा मालमत्ता कर जमा झाला असून, अद्यापही १३ कोटी रुपये थकबाकी आहे. या दोन दिवसांत १३ कोटींची वसुली झाल्यास मनपा कर्मचार्यांच्या किमान दोन महिन्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.
दोन दिवसांत मनपाला वसूल करावे लागतील १३ कोटी
By admin | Updated: March 30, 2017 03:03 IST