अकाेला : काेराेनावर मात करण्यासाठी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय आराेग्य यंत्रणेतील डाॅक्टर, कर्मचाऱ्यांना लस टाेचल्या जात असून, या माेहिमेची ही नुकतीच सुरुवात आहे. अर्थात काेराेनाचा धाेका अद्याप संपला नसल्याचे भान ठेवत महापालिकेच्या इयत्ता दहावीचा वर्ग असलेल्या एकमेव शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचे साेमवारी ‘लाेकमत’च्या पाहणीत आढळून आले. आपसांत सहा फूट अंतर राखून विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत हाेते.
स्वायत्त संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशा साेयी सुविधा उपलब्ध नसतात, अशी सातत्याने ओरड हाेते. याला महापालिकेची शाळा अपवाद आहे. शहरात मनपा शाळेत इयत्ता दहावीचा वर्ग असलेली एकमेव शाळा आहे. जुने शहरातील शिवसेना वसाहतमध्ये मनपा शाळा क्रमांक २६ मध्ये यंदा नववीच्या वर्गात ४० व दहावीच्या वर्गात २९ विद्यार्थी असून, त्यांना शिकविण्यासाठी १८ शिक्षक कार्यरत आहेत. दरम्यान, काेराेना संसर्गाच्या अनुषंगाने लसीकरणाच्या माेहिमेला सुरुवात झाली असली तरी अद्यापही काेराेनाचा धाेका संपला नसल्यामुळे शहरात मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष दिल्या जाते किंवा नाही, याबद्दल साेमवारी ‘लाेकमत’ने पाहणी केली असता विद्यार्थी आपसांत किमान सहा फूट अंतर राखून धडे गिरवीत असल्याचे दिसून आले.
मनपाकडून सॅनिटायझरचा पुरवठा
शाळेत दाखल हाेणारे विद्यार्थी व शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी मनपाच्या आराेग्य विभागाकडून गरजेनुसार सॅनिटायझरचा पुरवठा केला जात असल्याची माहिती आहे. काही विद्यार्थी घरून सॅनिटायझर आणतात. पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा हाेत असल्याचे पाहणीत आढळून आले.
वर्गखाेल्या व परिसराची स्वच्छता
दर एकदिवसाआड विद्यार्थ्यांसह शिक्षकांची शाळेत ५० टक्के उपस्थिती आहे. त्यामुळे शाळेकडून वर्गखाेल्यांची व परिसराची नियमित स्वच्छता राखली जाते. साेमवारीदेखील शाळेत साफसफाईची कामे सुरू असल्याचे दिसून आले.
शहरात इयत्ता दहावीचा वर्ग असलेली मनपाची एकच शाळा आहे. त्यामुळे याठिकाणी काेराेनाच्या अनुषंगाने साेयी सुविधा उपलब्ध करून देणे सहज शक्य आहे. नियमांचे तंताेतंत पालन करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला व शाळेतील मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.
-पूनम कळंबे उपायुक्त मनपा
....फाेटाे विनय टाेले...