अकोला : मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या महापालिकेच्या कर वसूली विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी थांबविले आहे. महापालिकेतील इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले असताना, सर्वात जास्त महसूल गोळा करणाऱ्या मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन आयुक्तांनी रोखल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.अकोला महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला २०१६-१७ साठी ३५ कोटींच्या कर वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. कर अधीक्षक विजय पारतवार यांच्या नेतृत्वात चार सहायक अधीक्षकांसह ६५ कर्मचाऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत २५ कोटींचा महसूल गोळा केला. दहा कोटींच्या महसुलाची तूट आली म्हणून मनपा आयुक्तांनी कर विभागातील ६५ कर्मचारी सोडून इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन केले. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सदर आदेश देत मुंबईकडे प्रस्थान केल्याने याबाबतचा फे रनिर्णय कोणी घेऊ शकत नाही. दरम्यान, मालमत्ता कर विभागाचे अधीक्षक विजय पारतवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. महापालिका उपायुक्त समाधान सोळंके आणि सुरेश सुरोसे यांची भेट घेऊन वेतन मिळण्यासाठी विनंती केली; मात्र मनपा आयुक्त लहाने आल्याशिवाय हा निर्णय बदलला जाणार नाही, असे सांगितले गेले. दरम्यान, ज्या कर निरीक्षकांनी कर उद्दिष्टाच्या ५० टक्केदेखील उद्दिष्ट पूर्ण केले नाही. त्यांना नोटिस बजावून कारवाईचा इशारा दिला जाणार आहे. सोबतच त्यांचे वेतन थांबण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. मागील आर्थिक वर्षात महापालिकेच्या कर विभागाने २३ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण केले होते. यंदा महापालिके च्या कर्मचाऱ्यांना ३५ कोटींचे उद्दिष्ट दिले गेले होते. नोटाबंदी, निवडणूक आणि सर्वेक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांचे प्रयत्न कमी पडले. त्यामुळे हे उद्दिष्ट २५ कोटींवर स्थिर झाले. एकूण ७१ टक्के कर वसुली कर्मचारी करू शकलेत. उद्दिष्टपूर्ती न झाल्याने मनपा आयुक्तांनी मालमत्ता कर वसुली कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले आहे.सहानुभूतीपूर्वक विचार होईलमहापालिकेच्या कर विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन मनपा आयुक्त अकोल्यात आल्यानंतर सोमवारपर्यंत होईल. कर्मचाऱ्यांना जाणीव करून देण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी असा निर्णय घेतला. मोठ्या प्रमाणात कर थकीत असताना वसुली होत नसल्याने ही कारवाई करण्यात आली.-समाधान सोळंके, मनपा उपायुक्त, अकोला.
मनपा मालमत्ता कर वसुली कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले
By admin | Updated: April 8, 2017 01:21 IST