अकोला : महावितरणमध्ये फोटो मीटर वाचनाची २ कोटी रुपयांची निविदा नियमबाहय़ देण्यात आली असून, कमी दरात दाखविलेली निविदा जास्त दरात देण्यात आली. या प्रकरणाची वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आल्यावरही कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित करीत संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख गणेश चौधरी यांनी केली आहे. महावितरणच्या वतीने अकोला मंडळ ग्रामीणमधील फोटो मीटर वाचनची क्र. टी- ४८ ते टी - ५४ ही दोन कोटी रुपयांची निविदा कंपनीच्या संकेतस्थळावर खुली करण्यात आली होती. ही निविदा दाखल करण्यासाठी चार अटी मान्य करणे आवश्यक होते. ज्या कंत्राटदाराला ही निविदा देण्यात आली, त्यांनी अटी पूर्ण केल्या नाही तरी त्यांना देण्यात आल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. निविदेतील ५.१ अ नुसार संबंधित कंत्राटदाराला ३ वर्षांंचा अनुभव आवश्यक होता. या निविदेकरिता २ लाख ६४ हजार ग्राहकांचे फोटो मीटर वाचनाचा अनुभव आवश्यक होते. या निविदेकरिता ३१ लाख ३५ हजार रुपयांची कामे यापूर्वी करणे आवश्यक होते; मात्र यापैकी सदर कंत्राटदाराने निकष पूर्ण केले नाहीत, त्यानंतरही त्याला कंत्राट देण्यात आले. तसेच ज्यावेळी संकेतस्थळावर निविदा सर्वांंसाठी खुली करण्यात आली, त्यावेळी संबंधित कंत्राटदाराने कमी रक्कम दाखविली. त्यानंतर कंत्राट देताना मात्र जास्त रकमेचा कंत्राट देण्यात आला. ही महाविरणची फसवणूक असून, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी चौधरी यांनी केली आहे.
महावितरणमध्ये दोन कोटींचा कंत्राट नियमबाहय़ !
By admin | Updated: July 10, 2015 01:25 IST