अकोला- विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अकोलेकरांचा सयंम सुटत असल्याचा प्रत्यय रविवारी आला. मूलभूत सुविधांसोबतच चांगले रस्तेही अकोलेकरांच्या नशिबी नाहीत काय, असा प्रश्न उपस्थित करीत 'आम आदमी' रस्त्यावर आला आणि त्यांनी रस्त्यांना लोकप्रतिनिधींचे नाव देऊन अभिनव आंदोलन केले. 'अच्छे दिन'चे वचन देणार्या आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या पक्षाचे दोन आमदार आणि खासदार असतानाही अकोलेकरांच्या नशिबी चांगले रस्तेसुद्धा येऊ नये, या भावनेतून सामान्य माणसांचा संयम सुटत असून, त्याचा प्रत्यय रविवारी आम आदमी पक्षाच्या आंदोलनाने आला. सामान्य अकोलेकरांना कोणताही त्रास होणार नाही आणि लोकप्रतिनिधींसोबतच प्रशासन आणि शासनाचेही लक्ष वेधता येईल, असे अभिनव आंदोलन आम आदमी पक्षाने रविवारी केले. ज्यांच्यावर शहराच्या विकासाची जबाबदारी येथील मतदारांनी सोपविली आहे, त्यांचेच नाव खड्डेमय रस्त्यांना देऊन विकास कामांबाबत असलेली लोकप्रतिनिधींची अनास्था दाखविण्याचा प्रयत्न या आंदोलनातून झाला. महानगर आम आदमी पक्षातर्फे करण्यात आलेल्या या आंदोलनात संदीप जोशी, मुजिब रहेमान, दर्पण खंडेलवाल, सुहास जैन, काझी लायक अली, अफजल तेली, आलिम मिर्झा, मनोज अवचार, उदय कनोरा, नरेंद्र पुंडकर, चिमणभाई डेडिया, आशिष कथळे आदींनी सहभाग घेतला होता.
या पाच रस्त्यांचे झाले नामकरण
* अग्रसेन चौक ते दुर्गा चौक या रस्त्याला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील मार्ग नाव देण्यात आले.
* टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौकाचे नामकरण खासदार संजय धोत्रे खड्डेमय मार्ग असे करण्यात आले.
* मोठे पोष्ट ऑफिस ते सिव्हिल लाइन चौक मार्गाला आ. रणधीर सावरकर नाव देण्यात आले.
* माळीपुरा रस्त्याला आ. गोवर्धन शर्मा यांचे नाव देण्यात आले.
* डाबकी रोडचे नामकरण महापौर उज्ज्वला देशमुख मार्ग करण्यात आले.