पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या
अकोला : बार्शिटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे येथे बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पक्ष्यांपासून माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ नये, या आनुषंगाने पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. त्या आनुषंगाने अशा व्यक्तींनी मास्कचा वापर करावा, नियमित साबणाने हात धुवावे तसेच परिसराचे निर्जंतुकीकरण करावे.
बाह्यरुग्ण विभाग सायंकाळीही सुरू ठेवणे बंधनकारक !
अकोला : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त संस्थांमध्ये बाह्यरुग्ण विभागाची सकाळी आणि सायंकाळी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे, मात्र राज्यातील अनेक शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळी बाह्यरुग्ण विभाग बंद असतो. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. रुग्णांची ही गैरसोय टाळण्यासाठी सर्वच शासकीय रुग्णालयांना सायंकाळी बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मोर्णा नदी पात्रात पुन्हा अस्वच्छता
अकोला : शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी अकोलेकरांनी स्वच्छता अभियान राबविले होते. तसेच शासनस्तरावर नदी सौंदर्यीकरणाचे कामही हाती घेतण्यात आले हाते. मात्र, काही वर्षांतच शासनासह अकोलेकरांना या मोहिमेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. अनेक जण नदीपात्रातच कचरा टाकतात. शिवाय, शहरातील सांडपाणी थेट नदी पात्रात जात असल्याने नदिला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
एसटी बसमध्ये प्रवाशांचा विनामास्क प्रवास
अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने ‘नो मास्क, नो एन्ट्री’ ही मोहीम राबविली होती. सुरुवातीला या नियमांचे सर्वांनीच पालन केले, मात्र आता या मोहिमेचा अनेकांना विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. एसटी बसमध्ये प्रवासी सर्रास विनामास्क प्रवास करत असल्याचे दिसून येते. हीच स्थितीत ऑटोरिक्षामध्येही पाहावयास मिळते. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.