अकोला : जिल्ह्यातील ५0 टक्कय़ांच्या आत जलसाठा असणार्या धरणांतून यावर्षी सिंचनासाठी पाणी सोडले जाणार नसले तरी मोर्णा व निगरुणा या दोन मध्यम सिंचन प्रकल्पांतील पाण्यावर रब्बीतील ओलिताचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे या धरणाच्या क्षेत्रात येणार्या शेतकर्यांना यावर्षी दिलासा मिळाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यात आली होती आणि पावसाचा ओलावा अधिक असल्याने रब्बी पिके चांगली होती; परंतु यावर्षी परिस्थिती उलट आहे. यंदा कृषी विभागाने तेवढेच नियोजन केले असले तरी प्रत्यक्षात काटेपूर्णा या मोठय़ा धरणातून यावर्षी सिंचनाला पाणी सोडण्यात येणार नाही. या धरणात आजमितीस ३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, ते पिण्याकरिता आरक्षित केले आहे. जिल्ह्यातील रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा, तर पूर्व विदर्भात जवस या पिकाची पेरणी करतात. करडी, मोहरी व गहू या पिकांचा पेराही केला जातो. गहू पिकाला पाण्याची गरज असल्याने संरक्षित सिंचनाची ज्यांच्याकडे सोय आहे, ते शेतकर्यांनी गहू पेरणी केली आहे. तथापि, उपलब्ध संरक्षित पाणी संपूर्ण हंगामात पुरेल, याची शाश्वती नसल्याने गहू पिकाचे क्षेत्रही यावर्षी घटले आहे. पण, मोर्णा व निगरुणा या मध्यम प्रकल्पात अनुक्रमे ५७.९४ व ९८.४७ टक्के जलसाठा असल्याने या धरणांतून सिंचनाला पाणी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. सिंचन विभागामार्फत या धरणांमधून यावर्षी ओलीतासाठी पाणी सोडले जाणार आहे. यासाठी सिंचन विभागाने जिल्ह्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्र सिचिंत करण्याचे नियोजन केले आहे.
मोर्णा, निगरुणातून होणार जिल्ह्यात सिंचन!
By admin | Updated: November 14, 2014 00:52 IST