लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : कापशी येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या एका ग्राहकाच्या बँक खात्यातून ऑनलाईन पळवलेली ५५ हजार रुपयांची रक्कम सायबर पाेलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीनंतर २४ तासात परत मिळवण्याची कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
प्रकाश पुंडलिक इंगळे (रा. कापशी तलाव) यांनी सायबर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कापशी शाखेमध्ये खाते असून, त्यामध्ये ९० हजार रुपयांची रक्कम हाेती. या बॅंक खात्यातील रकमेतून मुलाचे विमान तिकीट काढल्यानंतर ते रद्द करून तिकिटाचे पैसे परत मिळण्याकरिता गुगलवर विमान कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधून त्यावर इंगळे यांनी कॉल केला. यावेळी कस्टमर केअरच्या प्रतिनिधीने बॅंक अकाऊंटची तसेच एटीएमची माहिती विचारल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. त्यानंतर खात्यातील ५५ हजार रुपयांची रक्कम परस्पर काढल्याचे इंगळे यांना समजले. त्यांनी याबाबतची तक्रार सायबर पाेलीस ठाण्यात दिली. पाेलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तपास सुरू केल्यानंतर दाेन टप्प्यात ही रक्कम काढल्याचे तपासात पुढे आले. तसेच फ्लिपकार्ट व एरॉन पेला यांना ही रक्कम वळती झाल्याचे पाेलिसांच्या लक्षात आले. सायबर पाेलिसांनी दाेन्ही कंपन्यांशी संपर्क साधून रक्कम परत करण्याच्या सूचना केल्यानंतर त्यांनीही प्रक्रिया पूर्ण करून रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार ७ ते २१ दिवसांमध्ये ही रक्कम इंगळे यांना परत मिळणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनखाली सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके, अतुल अजने, गोपाल ठोंबरे, गणेश सोनोगे यांनी केली.