नीलेश शहाकार/बुलडाणा: कधी काळी डाक विभागातील सर्वाधिक महत्वाची सेवा म्हणून ओळखली जाणारी, मनीआर्डर सेवा आता बंद करण्यात येणार आहे. जाड्या, जुन्या मनीऑर्डर फॉर्मची विक्री थांबविण्याचे आदेश टपाल कार्यालयाला देऊन, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने तसे संकेत दिले आहेत. जुलै २0१३ मध्ये जवळपास १५0 वर्षे जुनी टेलिग्राफ सेवाही बंद करण्यात आली होती. एका गावाहून दुसर्या गावाला पैसे पाठविण्यासाठी वापरली जाणारी मनीआर्डर सेवा शंभर वर्षे जुनी आहे. सर्वसामान्यांच्या जिवनात ही सेवा कधी काळी अत्यंत महत्वाची होती; मात्र आधुनिक काळात पैसे पाठविण्यासाठी आधुनिक सुविधांचा उपलब्ध झाल्याने, जाड्या कागदाचा मनीआर्डर फॉर्म भरून पैसे पाठविणे नागरिकांनी बंद केले. शंभर वर्ष जुनी तारसेवा २0१३ साली बंद करण्यात आली. पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र, लिफाफा आदी जुन्या सेवा टपाल विभागामार्फत सुरू आहे. मनीऑर्डर पाठविण्यासाठी फॉर्म भरताना, त्यामध्ये संदेश लिहीण्याचीही सुविधा असायची. त्यामुळे आप्तेष्टास पैशासोबतच लेखी संदेशही पाठविला जात होता. काळाच्या ओघात ही सेवा निरूपयोगी ठरू लागली. एटीएम, ऑनलाईन बँकींगमुळे मनीऑर्डर सेवेतून टपाल खात्याला महसूल मिळेनासा झाला. त्यामुळे ही सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पोस्ट मास्टर महम्मद ऐजाज शेख ईस्माईल यांनी जुने मनीऑर्डर फॉर्म न विकण्याचे आदेश माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने फेब्रुवारी महिन्यातच दिले असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार ६ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये जुने मनीऑर्डर फॉर्म विकणे थांबविण्यात आले आहे. मनीऑर्डर सेवा बंद करण्यासंदर्भात स्पष्ट आदेश नाही. *नविन सेवांना चालना जुनी मनीऑर्डर सेवा बंद होण्याचे संकेत असले तरी, पैसे पाठविण्यासाठी टपाल विभागाच्या मनी ट्रान्सफर, मोबाईल मनीऑर्डर, इलेक्टॉनिक मनीऑर्डर, इन्स्टन्ट मनीऑर्डर आदी सेवा सुरु राहणार आहेत. या आधुनिक सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती बुलडाणा टपाल विभागाचे डाक सहाय्यक रमेश धनेरवा यांनी दिली.
मनीऑर्डर होणार इतिहास जमा!
By admin | Updated: March 20, 2015 00:41 IST