अकोला - शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील संदेश जिल्ह्यातील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. यासाठी शिक्षक विभाग, शाळा व्यवस्थापन, शिक्षक, मुख्याध्यापकांना चांगलीच धावपळ करावी लागल्याचे दिसून आले. पंतप्रधानांचा संदेश विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक सुविधा जिल्ह्यातील ४० टक्के शाळांमध्ये नव्हत्या; मात्र तरीही प्रशासनाने मोबाईल व रेडिओच्या माध्यमातून हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात जवळपास १ हजार ५६४ शाळांमधील सुमारे ३ लाख ३३ हजार १२५ विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचविण्यात आला. दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. ९० मिनिटांचा त्यांचा हा संवाद ४ वाजून ४५ मिनिटांनी आटोपला. यावेळी विद्यार्थ्यांनी मोदींशी मनमोकळेपणाने प्रश्न विचारुन विविध बाबींवर त्यांचे मत जाणून घेतले. जिल्ह्यातील तीन लाख विद्यार्थ्यांपैकी दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांना भाषण ऐकविण्याची सुविधा होती; मात्र उर्वरित जवळपास एक लाख विद्यार्थ्यांच्या कानावर पंतप्रधानांचे शब्द पडावेत, यासाठी शिक्षण विभागाने परिश्रम घेतल्याचे दिसून आले. पंतप्रधानांचे विचार देशातील विद्यार्थी व शिक्षकापर्यंत पोहोचावे, अशी केंद्र सरकारची मनीषा बहुतांश प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून आले. माध्यमिक शिक्षण विभागाच्या जिल्ह्यात ४३० शाळा असून, त्यापैकी बहुतांश शाळांमध्ये टीव्ही व रेडिओ उपलब्ध आहेत. मागास आणि दुर्गम भागात काही टीव्ही संच उपलब्ध करण्यात आले होते. मुख्याध्यापक व शिक्षकांनी टीव्ही संच मोबाईल व रेडिओद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत संदेश पोहोचविण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पंतप्रधानांचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने केला असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक सोनवने यांनी सांगीतले. माध्यमिक शिक्षण विभागाच्या ४३० शाळेमधील १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचविण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाºयांनी दिली.
अकोला जिल्हय़ातील तीन लाख विद्यार्थ्यांना मोदींचा संदेश
By admin | Updated: September 6, 2014 02:32 IST