अकोला - सिंधी कॅम्पमधील कच्ची खोली येथील रहिवासी जसवंत केसवाणी यांचा गुरुवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. केसवाणी यांचे राहत्या घराचे बांधकाम सुरू असताना त्यांना बांधकाम अवैध असल्याची नोटीस मनपाने बजावली होती. या नोटीसमुळे ते अस्वस्थ झाले आणि गुरुवारी त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मनपाने केलेल्या या कारवाईमुळेच जसवंत केसवाणी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.जसवंत केसवाणी यांचे कच्ची खोली येथे स्वत:चे घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचा व्यवसायाशी कुठलाही संबंध नसताना महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने त्यांना बांधकाम अवैध असल्याची नोटीस देण्यात आली. जसवंत केसवाणी यांनी महानगरपालिकेत जाऊन बांधकामाची सर्व परवानगी असल्याचे तसेच सदर बांधकाम हे व्यावासायिक नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. मात्र तरीही प्रशासनाने ही बाब लक्षात न घेता त्यांना बांधकाम अवैध असल्याची नोटीस देऊन कारवाई करण्याचा इशारा दिला. मनपाच्या या भूमिकेमुळेच ते अस्वस्थ झाले आणि गुरुवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. नातेवाईकांनी केसवाणी यांना तातडीने रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मनपा प्रशासनाच्या या नोटीसमुळेच जसवंत केसवाणी यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असून, या प्रकरणातील संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात केसवाणी यांच्या नातेवाईकांनी मनपा प्रशासनाच्या नोटीसमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार खदान पोलिस ठाण्यात करण्याचा निर्णय घेतला असून, गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी ही तक्रार पोलिस ठाण्यात केल्याची माहिती आहे.
मनपाच्या नोटीसमुळे सिंधी कॅम्पमधील इसमाचा हृदयविकाराने मृत्यू !
By admin | Updated: May 16, 2014 00:15 IST