अकोला: अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घ्यावी, किंवा देखभाल-दुरुस्तीचा खर्च द्यावा, अन्यथा १ नोव्हेंबरपासून योजनेचा पाणी पुरवठा बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून (मजीप्रा) जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला देण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर सोमवारी जिल्हा परिषदेत मजीप्रा आणि जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली आहे. खारपाणपट्टय़ातील आकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत चालविण्यात येत आहे. दरम्यान, गत २0 मे रोजी मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालकांची बैठक पार पडली. या बैठकीत ठरल्यानुसार आकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घ्यावी किंवा देखभाल व दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी दरमहा जिल्हा परिषदेने १५ लाख २५ हजार रुपये मजीप्राला द्यावे, अन्यथा १ नोव्हेंबरपासून आकोट येथील ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे, अशी नोटीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यवतमाळ येथील जलव्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिली आहे. त्यानुषंगाने आकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांनी सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता मजीप्रा व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांसह जिल्हा परिषद सदस्यांची संयुक्त बैठक बोलावली आहे. या बैठकीत ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेसंबंधी काय निर्णय घेतला जातो, याकडे आता लक्ष लागले आहे.
८४ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या मुद्यावर आज बैठक
By admin | Updated: October 27, 2014 01:30 IST