अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयाची मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) चमूने सोमवारी तपासणी केली. चमूने आकस्मिक पाहणीत वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची क्लासरूम, यंत्रसाहित्य व वॉर्डांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी गत वर्षीचे कामकाज आणि २0१५ मध्ये होणार्या कामकाजाचे नियोजनाबाबतचा अहवाल वरिष्ठ स्तरावर दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. पी. व्यंकट क्रिष्णा, दिल्ली येथील युसीमास अँण्ड जीटीबी हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. एन. के. अग्रवाल व बिहारमधील पाटना येथील आयजीआयएमएस वैद्यकीय महाविद्यालयातील अँनाटॉमी विभागाचे प्रमुख डॉ. विनोद कुमार यांचा समावेश असलेल्या मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या चमूने सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आकस्मिक भेट देऊन तपासणी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी येण्याआधीच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या चमूने तपासणी सुरू केली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १५0 जागांची प्रवेश प्रक्रिया, रुग्णालयातील रुग्णांसाठी असलेल्या सुविधा, शस्त्रक्रियेसह इतर यंत्रसाहित्य व विद्यार्थ्यांचा वर्षभराचा टाईमटेबल यावेळी चमूने तपासला. ५ जानेवारी २0१४ व ५ जानेवारी २0१५ ची संपूर्ण माहिती यावेळी चमूने घेतली. गत एका वर्षामध्ये रुग्णांना देण्यात आलेल्या सुविधा, संशोधन व शिक्षणासाबाबतची तपासणी करण्यात आली. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या चमूने सोमवारी पहाटे वैद्यकीय महाविद्यालयात अचानक भेट देऊन तपासणी केली. त्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. संपूर्ण एका वर्षाचा संगणकीय अहवाल चमूला सादर करण्यात आला असून, ही टीम पुढील अहवाल वरिष्ठ स्तरावर दाखल करणार असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी सांगीतले.
वैद्यकीय महाविद्यालयाची ‘एमसीआय’ चमूकडून तपासणी
By admin | Updated: January 6, 2015 01:37 IST