अकोला- पश्चिम विदर्भातील सहकार क्षेत्रातील समस्यांवर पुण्यात आयोजित सहकार व पणन मंत्र्यांच्या आढावा बैठकीत मंथन करण्यात आले. रविवारी झालेल्या या बैठकीत आमदार रणधीर सावरकर यांच्यासह पश्चिम विदर्भातील लोकप्रतिनिधींनी कापूस उत्पादकांच्या व्यथा मांडल्यात. पश्चिम विदर्भात मोठय़ाप्रमाणावर कापूस उत्पादन होते. या पट्टय़ात कापसाशिवाय दुसर्या नगदी पिकाचा आधार नाही. या भागात मोठय़ाप्रमाणावर शेतकरी आत्महत्या करीत असताना येथे कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्याऐवजी बंद पाडले जात आहेत. स्पिनिंग हबसारख्या योजनांमध्ये अकोल्यातील नीळकंठ सूतगिरणी, सावतराम मिल, मोहता मिल पुनर्जीवित करता येऊ शकते, याकडे आमदार सावरकर यांनी पुण्यातील बैठकीत सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी भरती प्रक्रियेतील घोळाकडे या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. कृषी उत्पन्न बाजार समितीतील वर्षानुवर्षांपासून सेवा देत असलेल्या कर्मचार्यांना पंधरा दिवसात कामावरून कमी करण्याचे आदेश पणन संचालकांनी डिसेंबर २0१४ मध्ये दिले होते. १५ ते २0 वर्षांपासून सेवेत असलेल्या कर्मचार्यांना कामावरुन कमी करणे, हा त्यांच्यावरील अन्याय असल्याचे आ. सावरकर यांनी सांगून परिपत्रक मागे घेण्यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. या बैठकीत सहकार क्षेत्रातील समस्यांबाबत आढावा घेण्यासोबतच सर्वंकष धोरण निश्चितीसाठी आढावा घेण्यात आला. बैठकीला विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. सतीश देशमुख, आ. स्नेहलता कोल्हे, माजीमंत्री बबनराव पाचपुते, सहकार सचिव आणि सहकार आयुक्तांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
पश्चिम विदर्भातील सहकार क्षेत्रातील समस्यांवर पुण्यात मंथन
By admin | Updated: February 23, 2015 01:47 IST