बार्शीटाकळी : असाध्य आजार बरे करण्याच्या नावाखाली भाविकांचा दरबार भरवून त्यांची आर्थिक लूट करणार्या तालुक्यातील मांडोली येथील एका भोंदूबाबाचा भंडाफोड संभाजी ब्रिगेडने पोलिसांच्या सहाय्याने १४ मे रोजी केला. माणिक महाराज उर्फ माणिक किसन जाधव (४५, रा. मांडोली) असे या भोंदूबाबाचे नाव असून, बार्शीटाकळी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.अंगात देवीचा संचार होत असल्याचा बनाव करणार्या माणिक महाराज याने तो कोणताही आजार बरा करू शकतो, असा समज परिसरात पसरवला होता. त्याच्या शेतातील एका मंदिरात अमावस्या आणि पौर्णिमेला तो भाविकांचा दरबार भरवित असे. या दरबारात अंगात देवी आल्याचा बनाव करून तो आलेल्या रुग्णांना भस्म, लिंबू, गंडे, दोरे देत असे. या मोबदल्यात तो रुग्णांकडून भरपूर आर्थिक मोबदला घेत असे. प्रत्येक रुग्णाला तो पाच ते सात आठवडे येण्यास सांगायचा. या कालावधीत तो रुग्णांना इतर कोणत्याही डॉक्टरकडे जाण्यास मज्जाव करायचा. विविध आजारांनी ग्रस्त रुग्ण माणिक महाराजचे ऐकून डॉक्टरांकडे उपचार करून घेत नव्हते. त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागल्याची गंभीर बाब संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. गजानन पारधी, जिल्हाध्यक्ष पंकज जायले, पातूर तालुकाध्यक्ष प्रदीप काळपांडे आदींना समजताच त्यांनी बुधवारी बार्शीटाकळी पोलिस ठाण्याचे ठाणेदार डी. सी. खंडेराव यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर दुपारी तीन वाजता सापळा रचून पोलिसांनी त्याच्या ठिकाणावर छापा मारून त्याचा भंडाफोड केला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
मांडोलीच्या भोंदूबाबाचा भंडाफोड
By admin | Updated: May 15, 2014 21:53 IST