खामगाव (बुलडाणा): उपविभागीय पोलिस अधिकारी जी.श्रीधर यांच्या पथकाने मलकापूरनजीक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल पिकनीकचे बाजूला क्लबवर आज रात्री छापा टाकला. या छाप्यादरम्यान जुगार खेळत असलेल्या ३४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख १ लाख १५ हजार, दोन कार, १४ दुचाकी असा लाखोंचा ऐवज जप्त केला.मलकापूर शहरानजीक हॉटेल पिकनीकचे बाजूला पैशाच्या हार-जितवर जुगाराचा क्लब चालत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी जी.श्रीधर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे आज २७ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास पथकातील उपविभागीय पोलिस अधिकारी जी.श्रीधर, सपोनि बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक इम्रान इनामदार, पोहेकाँ गुलाबराव काळे, नापोकाँ गजानन बोरसे, पोकाँ संदीप टाकसाळ, अजित परसुवाले, मपोकाँ मिसाळ, दीपक जाधव आदींनी छापा टाकला. यावेळी जुगाराचा डाव सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे या पथकाने जुगार्यांकडून एक लाख १५ हजार रोख तसेच स्विप डिझायनर व इंडिका कार, १४ दुचाकी असा लाखोंचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी शंकर वाघ रा.मलकापूर या क्लब चालकासह जुगार खेळणार्या ३४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत मलकापूर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
मलकापूरनजीक क्लबवर छापा
By admin | Updated: October 27, 2014 23:47 IST