अकोला: अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबाबतच्या जनजागृती कार्यक्रमात भरपावसातही श्रोत्यांच्या मिळालेल्या प्रतिसादातून कायद्याबद्दलची तळमळ दिसली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंचावरच प्रा. श्याम मानव यांनी या कायद्याबद्दलची माहिती श्रोत्यांना दिली. पावसामुळे कार्यक्रम रद्द होतो की काय, अशी स्थिती असताना श्रोत्यांनी घराचा रस्ता न पकडता मंचावरच बसून, कार्यक्रम ऐकण्याच्या आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. सायंकाळी सहा वाजता ह्यवैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदाह्ण या विषयावर प्रा. श्याम मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पाच वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. या पावसातही नाट्यगृहात श्रोत्यांची गर्दी होतीच. कार्यक्रमाला सात वाजता सुरुवात करण्यात आली. त्यावेळी पाऊस जोरात सुरू झाला. त्यामुळे मंचावर श्रोत्यांना बोलावून वक्त्यांनी कायदा समजावून सांगायला सुरुवात केली. यावेळी प्रा. श्याम मानव म्हणाले, हा कायदा सभागृहात मांडल्यानंतरच आमच्यावर हल्ला होईल, अशी शक्यता होती, तसे आम्ही पोलिसांना कळविले होते. माझ्यावर एकदा प्राणघातक हल्लाही झाला होता. त्यानंतर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्यामुळे दाभोलकरांची हत्या धक्कादायक असली तरी अनपेक्षित नव्हती. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबद्दल बराच अपप्रचार करण्यात आला. हा कायदा कसा चुकीचा असून, यामुळे निर्दोष लोकांवरही गुन्हा दाखल होऊ शकेल, अशी धास्ती निर्माण करण्यात आली. मात्र, दाभोलकरांच्या हत्येनंतर अखेर कायदा विधानभवनात संमत झाला. त्यानंतर या कायद्याची जनजागृती करण्याची आम्हाला गरज वाटली. त्यामुळे शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन राज्यभर करण्यात येत असल्याचे मानव यांनी सांगितले.
‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’ ऐकण्यासाठी भरपावसातही श्रोत्यांची दाद
By admin | Updated: November 15, 2014 00:17 IST