अकोला : बिर्ला रोड परिसरातील रामदूत अपार्टमेंटलगत चक्क रस्त्यावर घर बांधणार्या मनपातील मानसेवी महिला कर्मचार्याला येत्या सात दिवसात अतिक्रमित घर खाली करण्याची नोटीस मंगळवारी सायंकाळी महापालिका प्रशासनाने बजावली. जागा न सोडल्यास, जेसीबीच्या मदतीने अतिक्रमित घराचा गाशा गुंडाळणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले. मनपामध्ये मानधन तत्त्वावर कार्यरत सुनीता मोरे नामक महिला कर्मचारी बिर्ला रोड परिसरातील रामदू त अपार्टमेंटलगत अतिक्रमित घरात वास्तव्याला आहेत. चक्क रस्त्याच्या मधोमध घर उभारल्यामुळे रामदूत अपार्टमेंटमधील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात रामदूत अपार्टमेन्टमधील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार केली होती; परंतु सदर तक्रारीला केराची टोपली दाखवून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. याविषयीचे सविस्तर वृत्त लोकमतमध्ये उमटताच, प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेतली. उशिरा का होईना, १६ सप्टेंबर (मंगळवार)रोजी अतिक्रमक मोरे यांना नोटीस जारी करण्यात आली. येत्या सात दिवसात रस्त्याची जागा न सोडल्यास, जेसीबीच्या मदतीने अतिक्रमण काढण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सात दिवसात जागा सोडा, अन्यथा..
By admin | Updated: September 17, 2014 02:38 IST