अकोला : काटेपूर्णा अभयारण्य आणि महान धरण परिसरातील आकाशात स्वच्छंद विहार करणार्या पक्ष्यांवर शिकार्यांची नजर असून,धरणाच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या मोठय़ा वडाच्या झाडावर पक्षी पकडण्यासाठी शिकार्यांनी लावून ठेवलेले मच्छीमार्यांचे जाळे मंगळवारी दुपारी काटेपूर्णा वन्य जीव विभागाने हस्तगत केले. पक्ष्यांची शिकार करणारी टोळी या भागात सक्रिय असल्याचे या कारवाईतून स्पष्ट होत आहे. महान धरणाच्या प्रवेशद्वाराजवळील मोठय़ा वडाच्या झाडावर शिकार्यांनी पक्षी पकडण्यासाठी मच्छीमारीची जाळे लावून ठेवले असल्याची माहिती अकोल्यातील सर्पमित्र मुन्ना ऊर्फ शेख मोहम्मद यांना मंगळवारी पहाटे मिळाली. माहिती मिळताच त्यांनी सागर बोक्षे, राहुल ठाकूर, अनिल चौधरी, अंकुश चौधरी या चौघा सर्पमित्रांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. ही माहिती त्यांनी काटेपूर्णा वन्य जीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एन. पुयाड यांनाही दिली. माहिती मिळताच वनोजाचे वनपाल एल.जी. डांगे, बिट जमादार जी.वाय. वरडे, वनरक्षक के.आर. खडसे आणि राहुल भिकाजी इंगळे यांना सोबत घेऊन त्यांनी घटनास्थळ गाठले. सोमवारी दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास सर्पमित्रांच्या मदतीने वडाच्या झाडावर शिकार्यांनी पेरलेले जाळे काढण्यात आले. परिसरात विहार करणार्या पक्ष्यांची शिकार करण्यासाठी लावण्यात आलेल्या या जाळय़ात एक हरियाल, एक गिधाड, १ पोपट आणि चार इतर पक्षी अडकून मरण पावले असल्याचे दिसून आले. जाळे खाली उतरवून सर्पमित्रांनी मृत पावलेले पक्षी व त्यांची हाडे बाहेर काढली. त्यानंतर हे जाळे वन्य जीव विभाग अधिकार्यांच्या समक्ष जाळण्यात आले. पक्ष्यांच्या शिकारीचा हा प्रकार हा काटेपूर्णा वन्यजीव विभागात प्रथमच आढळून आला असल्याने या भागात पक्ष्यांची शिकार करणारी टोळी सक्रिय असल्याचे अधोरेखित होत आहे.
काटेपूर्णा अभयारण्यातील पक्ष्यांवर शिका-यांची नजर
By admin | Updated: December 17, 2015 02:16 IST