अकोला : ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी फारशा उपलब्ध नसल्या तरी विद्यार्थी व नागरिकांमध्ये प्रयोगशीलता, प्रतिकूल परिस्थितीतही नवीन संशोधन करण्याची वृत्ती आहे, यालाच ह्यउद्यमशीलताह्ण म्हणतात. सध्या २१ व्या शतकात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान हीच सर्वात मोठी ताकद असून, याची कास धरून देशाला समृद्ध करण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी १२ जानेवारी रोजी पातूर येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केले. बेरार एज्यूकेशन सोसायटी पातूर अंतर्गत असलेल्या तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शताब्दी महोत्सव ३ ते १२ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम सोमवारी दुपारी पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. पांडुरंग फुंडकर होते. प्रमुख उपस्थिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. हरीश पिंपळे, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप अंधारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, भाजपचे शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, पातूर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष वर्षा बगाडे, नगरसेवक राजू उगले यांची होती. मंचावर बेरार एज्यूकेशन सोसायटीच्या सचिव स्नेहप्रभादेवी गहिलोत व तुळसाबाई कावल माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचे प्राचार्य विजयसिंह गहिलोत उपस्थित होते. पुढे नितीन गडकरी म्हणाले की, अनेक शाळांमध्ये इमारत असते तर शिक्षक नसतात, शिक्षक असतात तर शिक्षण नसते. तुळसाबाई कावल विद्यालयात मात्र या सर्व बाबी पहायला मिळाल्या. याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यायला हवे. मूल्याधिष्ठीत शिक्षणपद्धती ही महाराष्ट्राची विशेषता आहे. आपल्या शिक्षणातील भावार्थ काय आहे, हे समजून घ्यायला हवे. शिक्षण घेऊन मोठय़ा पदावर जाणे एवढेच नाही तर चांगले नागरिक बनने, हे आपले ध्येय असायला हवे. चांगले शिक्षण घेऊन त्याचा फायदा आपल्या देशाला करून द्यायला हवा, असे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना आ. पांडुरंग फुंडकर म्हणाले की, १00 वर्षांनंतर या संस्थेच्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. शताब्दी महोत्सवानंतर आता या संस्थेचा द्विशताब्दी महोत्सव साजरा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संचालन निलेश पाकदुने यांनी, तर प्रास्ताविक प्राचार्य विजयसिंह गहिलोत यांनी केले.
ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान २१ व्या शतकातील सर्वात मोठी ताकद
By admin | Updated: January 13, 2015 01:26 IST