अकोला : भारतीय संस्कृतीमध्ये कीर्तनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आमच्या संस्कृतीचे अंग असलेल्या कीर्तनाचा उपयोग समाजप्रबोधनासाठी होणे गरजेचे आहे. कीर्तन महाविद्यालयातून जे कीर्तनकार तयार होत आहेत, त्यांनी कीर्तनाचा उपयोग उपजीविकेसाठी नव्हे, तर प्रबोधनासाठी करावा, असे आवाहन ह.भ.प. लक्ष्मीनारायण दायमा महाराज यांनी बुधवारी अकोल्यात केले. श्री ब्रह्मचैतन्य धार्मिक सेवा प्रतिष्ठानद्वारा संचालित नाईकवाडे कीर्तन महाविद्यालयाच्या वतीने व प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या सहकार्याने आयोजित नारदीय कीर्तन महोत्सवाला बुधवारी प्रमिलाताई ओक सभागृहात आरंभ झाला. यावेळी उदघाटनपर मनोगत दायमा महाराज यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर कीर्तन महोत्सवाचे पहिले पुष्प गुंफणारे पुणे येथील संदीपबुवा मांडके, भाऊसाहेब नाईकवाडे, डॉ. शरद कुळकर्णी, मनमोहन तापडिया, डॉ. एस.आर. बाहेती व प्राचार्य धनश्री मुळावकर उपस्थित होत्या. ज्ञानाचा संबंध उपजीविकेशी जोडल्यास ज्ञानाची किंमत कमी होते. त्यामुळे कीर्तनाला प्रबोधनाचे माध्यम बनवा व समाजाला योग्य दिशा द्या, असे दायमा महाराज यांनी सांगितले.
कीर्तन उपजीविकेचे नव्हे, प्रबोधनाचे माध्यम व्हावे
By admin | Updated: November 13, 2014 01:11 IST