गांधीग्राम (अकोला) : खारपाणपट्टय़ातील हजारो लोकांची जीवनदायिनी असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात रसायनयुक्त पाणी सोडून नदीतील पाणी दूषित करणार्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य शोभा शेळके यांनी सोमवार, ८ डिसेंबर रोजी गांधीग्राम येथील पूर्णा नदी पात्रात बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. पूर्णा बचाव संघर्ष समितीचे शेकडो कार्यकर्तेही त्यांच्यासोबत साखळी उपोषणास बसले आहेत.अकोला जिल्हय़ातील हजारो लोकांची जीवनदायिनी असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात गत वर्षापासून अमरावती येथील एमआयडीसी परिसरातील रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे या नदीकाठी असलेल्या नळयोजना बंद पडल्या असून, अनेकांना नाईलाजाने दूषित पाणी प्यावे लागत आहे. नदीचे पाणी दूषित करणार्यांविरुद्ध तक्रारी केल्यानंतरही संबंधितांवर कारवाई होत नसल्यामुळे जि.प. चोहोट्टा सर्कलच्या सदस्य शोभा शेळके व पूर्णा बचाव संघर्ष समितीने सोमवारपासून पूर्णा नदी पात्रात बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. सोमवारी सकाळी ११ वाजता शोभा शेळके व त्यांच्या सहकार्यांनी नदीपात्रात बसून उपोषणास सुरुवात केली. उपोषणस्थळाला अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी भेट देऊन शेळके यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली; परंतु शेळके आपल्या भूमिकेवर ठाम रहिल्या. त्यांच्या विनंतीवरून शेळके पूर्णा पात्रातून उपोषण मंडपात आल्या.
पूर्णेच्या पात्रात आरंभले बेमुदत उपोषण
By admin | Updated: December 9, 2014 00:42 IST