अकोला : विदर्भातील रब्बी पिकांचे क्षेत्र कसे वाढविता येईल, या विषयावर ५६ व्या विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार सभेत तज्ज्ञांनी आढावा घेतला. रब्बीचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकर्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य ते भाव ठरले पाहिजे, यावर यावेळी मंथन करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ.के.आर. ठाकरे सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. सभेला कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले, विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार, डॉ.सी.एन. गांगडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. विदर्भातील दुबार पिकांखालील क्षेत्र वाढविण्याची नितांत गरज असून, कृषी विद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञान, शिफारशी शेतकर्यांच्या शेतापर्यंत नेण्याची खरी जबाबदारी कृषी विभाग व शास्त्रज्ञांची असल्याचे आवाहन कुलगुरू दाणी यांनी यावेळी केले. शेतात घाम गाळून पिके काढणार्या शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी शेतमालाला आधारभूत किंमत मिळायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी कृषी विद्यापीठाने तशा शिफारशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.डॉ. इंगोले यांनी खरीप हंगाम लांबल्याने रब्बी हंगामालादेखील विलंब होत असल्याचे सांगितले. त्यामुळे कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी त्यादृष्टीने रब्बी हंगामाचे नियोजन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सरदार यांनी तेलबिया पिके वाढीवर भर देतानाच पश्चिम विदर्भातील इतर रब्बी पिकांचे क्षेत्र वाढविण्यावरही भर दिला. यावर्षी आठ लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आहे; परंतु हे क्षेत्र १२ लाखांच्यावर नेण्याची गरज असल्याने विभागातील कृषी अधिकार्यांनी त्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पावसाचा प्रत्येक थेंब मुलस्थानी जिरविला तरच रब्बी हंगामात त्याचा लाभ होत असल्याने कृषी अधिकार्यांनी गावोगाव शेतकर्यांशी संपर्क ठेवून त्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन सरदार यांनी केले.
विदर्भात रब्बी पीक वाढविण्यावर भर!
By admin | Updated: October 5, 2014 23:39 IST