शहरात सुरू असलेल्या अवैध सावकारी विरोधात बुधवारी जिल्हा उपनिबंधक यांच्या आठ पथकाने विविध ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये पहिल्या कारवाईत आर.टी. पालेकर यांच्या पथकाने रामदासपेठ गल्ली क्रमांक दोन येथील अरुण बालमुकुंद शर्मा यांच्या घराची पाहणी केली. त्यांच्या घरातून पथकाने १३ धनादेश पुस्तिका, १२१ कोरे धनादेश, ६ कोरे स्टँप, ६ नोंदवह्या, १० स्थावर मालमत्तेचे दस्तऐवज, रोख ८ लाख ४६ हजार ३६५ रुपये जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम सुपूर्दनाम्यावर परत करण्यात आली आहे. दुसरी कारवाई ही ए.ए. मनवर यांच्या पथकाने खोलेश्वर येथील गजानन महाराज मंदिरासमोरील रहिवासी अशोक श्रीराम शर्मा यांच्या घरी केली. कारवाईत कुठलेही आक्षेपार्ह दस्तऐवज आढळले नाहीत. तिसरी कारवाई एस.डब्ल्यू. खाडे यांच्या पथकाने गीतानगर येथील दिगांबर माखनलाल शर्मा यांच्या घरी केली. कारवाईत चार ते पाच नोंदवही, १० स्थावर मालमत्तेचे दस्तऐवज आढळून आले. चौथी कारवाई एस.एस. खान यांच्या पथकाने चवरे प्लॉट स्थित अलकनंदा अपार्टमेंट येथील नितीन प्रभुदयाल जोशी यांच्या घरी केली. कारवाईत स्वत:चे सात बँक पासबुक, तसेच एक स्थावर मालमत्तेचे दस्तऐवज आढळून आले. पाचवी कारवाई जे.आर. मलिये यांच्या पथकाने अरुण बालमुकुंद शर्मा यांच्या जवाहरनगरातील कार्यालयात केली. या ठिकाणी पथकाला दोन बँक पासबुक, तीन स्थावर मालमत्तेचे दस्तऐवज, बँक खात्याचे खाते उतारे आढळून आले. तसेच सहावी कारवाई जी.बी. राठोड यांच्या पथकाने अरुण बालमुकुंद शर्मा यांच्या टिळक रोड स्थित त्रिवेणी कॉम्प्लेक्समधील अरुण सेल्स कॉर्पोरेशन या दुकानात केली. या ठिकाणी ९५ कोरे धनादेश जप्त करण्यात आले. यामध्ये ६० ते ६५ धनादेश स्वत:चे असल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त ४ स्थावर मालमत्तेचे दस्तऐवजाच्या छायाप्रति आढळून आल्या. सातवी कारवाई ही आर.आर. विटणकर यांच्या पथकाने रामदासपेठ स्थित टिळक पार्क येथील रहिवासी पवन बालमुकुंद शर्मा यांच्या घरी केली. कारवाईत पथकाने एक डायरी, एक उसनवार करारनामा, एक धनादेश, राेख रक्कम ५१, २७० जप्त करण्यात आली. रोख रक्कम ही सुपूर्दनाम्यावर परत करण्यात आली. तसेच आठवी कारवाई ही जे.आर. मलिये यांच्या पथकाने अरुण बालमुकुंद शर्मा यांच्या जुने शहरातील अक्कलकोट परिसरातील जुन्या घरी केली. या ठिकाणी पथकाने १० धनादेश, ३ स्टँप पेपर आणि एक डायरी जप्त केली. ही कारवाई जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कहाळेकर यांच्या निदर्शनानुसार करण्यात आली. विविध पथकांमध्ये सहकार विभागाच्या प्रशासन व लेखापरीक्षण शाखेतील ३१ अधिकारी व कर्मचारी, पोलीस विभागाचे १७ अधिकारी, कर्मचारी आणि १४ पंच आदींचा समावेश होता.
सुधारीत- शहरातील आठ ठिकाणी अवैध सावकारांवर छापेमारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST