लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवैध सावकारी करून व्याजाने पैसे देणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी गौरव अशोक शर्मा याच्याविरुद्ध सोमवारी उशिरा रात्री रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी जयंत श्रीराम सहारे यांच्या तक्रारीनुसार, दक्षता नगरातील कॉम्प्लेक्समध्ये गजानन ट्रेडिंग कंपनी चालविणारा गौरव अशोक शर्मा हा सावकारी व्यवसाय करण्याचा त्याच्याकडे परवाना नसतानासुद्धा अवैधरीत्या सावकारीचा व्यवसाय करायचा. यासंदर्भात उपनिबंधक कार्यालयाकडे गौरव शर्मा याची तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीमध्ये गौरव हा अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याचे समोर आले. त्याने मंगेश देशमुख यांच्यासोबत दोन लाख रुपयांचा व्यवहार केला होता. देशमुख यांनी त्याला व्याजासह पैसे परत केल्यानंतरही गौरव शर्मा हा त्यांना शिवीगाळ करून मारहाणीची धमकी देऊन पैशांची मागणी करायचा. जयंत सहारे यांच्या तक्रारीनुसार, रामदासपेठ पोलिसांनी गौरव शर्मा याच्याविरुद्ध कलम ३९ महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.
अवैध सावकारी; राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: May 31, 2017 01:54 IST