अकोला-मेडशी-वाशिम राष्ट्रीय महामार्ग १६१ च्या १० किलोमीटर विभागात वृक्षतोडीत त्रुटी आढळून आल्या आहेत. परवानगी नसताना तसेच ज्या झाडांचा सर्वेक्षणात समावेश नाही अशी झाडे तोडण्यात आली आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये १० हजार झाडे तोडण्यात येणार आहेत. ही झाडे तोडण्यासाठी यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले. मात्र या सर्वेक्षणानंतर ३००० पेक्षा जास्त झाडांची तफावत असल्याचा आक्षेप सामाजिक संघटना व वनप्रेमींनी घेतला आहे. त्या अनुषंगाने अकोला उपवनसंरक्षक (डीवायसीएफ) अर्जुन के. आर. यांनी १६ फेब्रुवारी रोजी रुंदीकरणाच्या महामार्गावर झाडांचे संयुक्त सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार अकोला सहायक वनसंरक्षक (एसीएफ) एस. ए. वडोदे यांच्या नियंत्रणात झाडांचे सर्वेक्षण सुरू असतानाच अकाेला ते पातूर रस्त्यावरील प्रभात स्कूल ते नांदखेड फाट्या पर्यंत १० किलोमीटर अंतराचे सर्वेक्षण केले असता १० झाडे बेकायदेशीरपणे कापल्या गेल्याचे समाेर आले आहे. यासंदर्भात वडोदे यांना विचारणा केली असता त्यांनी केवळ मानवी चुका व त्रुटींमुळे ही झाडे तोडल्या गेल्याचे सांगितले. ही झाडे तोडण्यामागे कोणताही गैरप्रकार दिसत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अकोला-वाशिम रस्ता रुंदीकरणात झाडांची अवैध कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:24 IST