तेल्हारा : तालुक्यातील मनात्री परिसरात गत काही दिवसांपासून मातीचे अवैध उत्खनन सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाेत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली. १२ जानेवारीला मनात्री परिसरात पटवारी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनात्री परिसरात हाेत असलेल्या मातीच्या उत्खननाची पाहणी केली. या प्रकरणाची चाैकशी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मनात्री परिसरात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या आहेत. त्या वीटभट्ट्यांवर हजारो ब्रास मातीची दररोज वाहतूक हाेत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरवर्षी नापिकी होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच शेताच्या बाजूला मातीचे अवैध उत्खनन हाेत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत महसूल विभागाच्या अधिाऱ्यांनी मातीच्या अवैध उत्खननाची चाैकशी सुरू केली आहे.