साहित्य जळून खाक सुदैवाने जीवित हानी नाही
अकोला : मोठी उमरी परिसरात असलेल्या विठ्ठल नगर दोन मजली इमारतीला सोमवारी रात्री उशिरा अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत साहित्य जळून खाक झाले असले तरी सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अंतर्गत वादातून ही आग लागल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
मोठी उमरी येथील रहिवासी निखिलेश अम्बिकाप्रसाद हरदे यांचे दोन मजली घर असून, या घराला सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या एका बंबाद्वारे आग विझविण्यात आली. त्यानंतर या घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अंतर्गत वादातून ही आग लावल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून प्राप्त झाली असून, त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.