अकोला : अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २८ मे रोजी दुपारी घडली. बुधवारी रात्री या प्रकरणी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. गोरक्षण रोडवरील कपिलानगरात राहणारे प्रांजल नरेंद्र पुरोहित यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते बुधवारी दुपारी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील मागील बाजूस असलेला दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले रोख ४0 हजार रुपये, २६.७0 ग्रॅमचे सोन्याचे एक कडे, प्रत्येकी ५ ग्रॅमचे कानातील सोन्याचे टॉप्स असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. प्रांजल पुरोहित बुधवारी रात्री ९.३0 वाजतादरम्यान घरी परतल्यावर त्यांना घरातील साहित्य इतरत्र पसरलेले दिसले. त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकरणी खदान पोलिसांना माहिती दिली; परंतु पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. चोरट्यांनी पुरोहित यांच्या घराच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीच्या काचा फोडून आणि लोखंडी गज वाकवून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कोणत्याही घरामध्ये चोरी झाल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळावर पोहोचून पाहणी करतात आणि घटना मोठी असेल तर श्वान पथक आणि फिंगर प्रिंट तज्ज्ञाला पाचारण करतात. पण गंभीर गुन्हा घडल्यानंतरही त्याची गांभीर्याने खदान पोलिसांनी दखल घेतली नाही.
सव्वा लाख रुपयांची घरफोडी
By admin | Updated: May 30, 2014 01:39 IST