अकोला : माणूस जगाच्या कोपऱ्यात कोठेही गेला, तरी त्याला मायभूमीची ओढ असतेच. आपण जेथे जन्मलो, वाढलो, खेळलो त्या मायभूमीसाठी काहीतरी करावे, ही तळमळ प्रत्येकातच असते. अशाच तळमळीतून जिल्ह्यातील कान्हेरी सरप येथील भूमिपुत्र व नोकरीनिमित्त सध्या जपानची राजधारी टोकियो येथे वास्तव्यास असलेल्या मोहन भटकर यांनी त्यांच्या जपानी व मराठी मित्रांच्या सहकार्याने पाच लाख येन (जपानी चलन) कान्हेरी येथे सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामासाठी मदत म्हणून पाठविले आहेत. पाणी फाउंडेशनच्या "वॉटर कप" या स्पर्धेंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप या गावात गत दोन महिन्यांपासून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. गावातील व शेतशिवारातील पाणी जमिनीत मुरविण्यासाठी गावकरी कोणत्याही राजकीय व शासकीय मदतीशिवाय श्रमदानातून जलसंधारणाची कामे करीत आहेत. आतापर्यंत नदी खोलीकरण, शोष खड्डे, नाला खोलीकरण, गाळ काढणे, समतल चर, वनराई बंधारे यासारखी कामे करण्यात आली आहेत. कान्हेरी गावात सुरू असलेल्या या कामांची माहिती या गावचे भूमिपुत्र असलेले व सध्या जपानची राजधारी टोकियो या शहरात वास्तव्यास असलेल्या मोहन भटकर यांना त्यांच्या गावातील मित्र व कुटुंबीयांकडून मिळाली, तसेच फेसबुकवरही त्यांनी जलसंधारणाच्या कामांची माहिती घेतली. आपल्या गावात जलस्रोत बळकटीकरणासाठी काम सुरू असल्याचे पाहून भारावून गेलेल्या मोहन भटकर यांनी यासाठी काहीतरी मदत करण्याचे ठरविले. आपल्या गावात सुरू असलेल्या जलसंधारण कामांची माहिती त्यांनी टोकियोतील त्यांच्या जपानी मित्रांना पे्रझेंटेशनद्वारे दिली. मोहन भटकर व त्यांचे जपानी मित्र ताजिमा, हितोमी, नोकोता, सुसुमू, तामिआची अकिमो यांनी लोकसहभागातून होत असलेल्या कान्हेरीतील कामासाठी मदत करण्याचा निश्चय केला व पाहता-पाहता पाच लाख येन गोळा केले. मोहन भटकर यांनी त्यांच्या कान्हेरी येथील कुटुंबीयांकडे पाच लाख येनचा धनादेश पाठविला असून, गत आठवड्यातच तो प्राप्त झाला आहे. या निधीतून जलसंधारणाच्या कामास आणखी गती मिळणार आहे. कान्हेरीचे भूमिपुत्र मोहन भटकर व त्यांच्या जपानी मित्रांच्या या दातृत्वाची सर्वत्र चर्चा होत असून, गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.बंधाऱ्याच्या कामासाठी निधीचा वापरकान्हेरी येथे श्रमदानातून बंधाऱ्याच्या कामास सुरुवात झाली आहे. या कामासाठी लागणारे लोखंड, सिमेंट व इतर साहित्याची खरेदी करण्याकरीता मोहन भटकर यांन पाठविलेल्या पैशांचा वापर करण्यात येत असल्याचे शरद गव्हाळे यांनी सांगितले."वॉटर कप" स्पर्धेची कीर्ती जपानमध्येजलसंधारण कामांच्या ह्यवॉटर कपह्ण या स्पर्धेबाबत मोहन भटकर यांच्याकडून माहिती मिळाल्यापासून ही स्पर्धा टोकियोमधील त्यांच्या मित्रांमध्ये कमालीची लोकप्रिय झाली आहे. या स्पर्धेबाबत भटकर यांच्या मित्रांमध्ये सतत चर्चा सुरू असते. जलसंधारणाच्या कामांसाठी त्यांच्या जपानी मित्रमंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कान्हेरीतील जलसंधारण कामासाठी जपानमधून मदत
By admin | Updated: May 11, 2017 07:16 IST