अकाेला: शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रविवारी सायंकाळ पासून बरसणाऱ्या पावसाने साेमवारी सकाळी अकाेलेकरांची झाेप उडवली. शहरात सखल भागात पाणी तुंबण्यासाेबतच उमरी परिसरातील ताथाेड नगरात रहिवाशांच्या घरात नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांची व मनपा प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. याठिकाणी माजी नगरसेवकांसह मनपाची यंत्रणा कामाला लागली. दरम्यान, कृषी नगर, राहुल नगर आदी रहिवासी वस्त्यांमधील पाणी काढण्यासाठी पंपांचा वापर केला जात आहे.
जिल्ह्यासह शहरात १४ जुलै ते १७ जुलै या दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला हाेता. पावसाने शनिवारी थाेडीफार उसंत घेतल्यानंतर रविवारी रिपरिप सुरु हाेती. दरम्यान, रविवारी सायंकाळी सात वाजतापासून सतत बरसणाऱ्या पावसामुळे साेमवारी शहरवासीयांची झाेप उडवली. शहराच्या विविध भागात रहिवासी वस्त्यांमध्ये कंबरेपर्यंत पावसाचे पाणी तुंबल्याची परिस्थिती आहे. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची धांदल उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी माजी नगरसेवकांसह महापालिकेची झाेन निहाय यंत्रणा तसेच नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातील कर्मचारी सरसावले आहेत.
ताथाेड नगरमध्ये नागरिकांच्या घरात पाणी
उमरी परिसरातील ताथाेड नगरस्थित सुमारे ५० ते ६० नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली हाेती. मनपाने डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात भूमिगत गटार याेजनेंतर्गत सात एमएलडी प्लान्ट उभारला. ताथाेड नगरमधून हा प्रकल्प पुढे नेण्यात आला. त्यासाठी एका नाल्याजवळून मलवाहिनीचे काम करण्यात आले. यात भरीस भर पीडीकेव्ही परिसरातून येणाऱ्या नाल्याचे पाणी व सिव्हिल लाइन, सुधीर काॅलनी व जवाहर नगरमधील नाल्याचे पाणी ताथाेड नगरातील नाल्यात जात असल्याने हा नाला ओव्हरफ्लाे हाेऊन नागरिकांच्या घरात घाण पाणी शिरले.