अकोला: शहरातील रस्त्यांची झालेली वाईट स्थिती आणि जलवाहिन्यांना लागलेली गळती, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर रविवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनाच रस्त्यावर उतरावे लागले. त्यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम सात दिवसांत पूर्ण करण्याचे आणि जलवाहिन्यांना लागणारी गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीची कामे तातडीने करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला दिले. अकोला शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून, या समस्येने अकोलेकर त्रस्त झालेत. गत बुधवारी अशोक वाटिका चौकात झालेल्या अपघातात अडीच वर्षीय अथर्व नितीन उजाडे या बालकाचा मृत्यू झाला. तसेच शहरातील विविध भागात जलवाहिन्यांना गळती लागल्याने रस्त्यांवरुन पाणी वाहत आहे आणि अनेक भागात गटारे तुंबले असून, त्यामुळे गटारांचे पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. या पृष्ठभूमीवर पालकमंत्री डॉ. पाटील यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि गटारांमधून रस्त्यांवर वाहणार्या पाण्याची पाहणी केली. त्यामध्ये जवाहरनगर चौक आणि रतनलाल प्लॉट चौक भागातील रस्ते व गटारांची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. येत्या सात दिवसांत शहरातील रस्त्यांवरील खडे बुजवून, जलवाहिन्यांना लागणार्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश डॉ.पाटील यांनी मनपा प्रशासनाला यावेळी दिले. गटारांमधून रस्त्यांवर पाणी येणार नाही, यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी महापौर उज्ज्वला देशमुख, मनपा आयुक्त सोमनाथ शेटे, उपायुक्त माधुरी मडावी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
*अधिकार्यांना धरले धारेवर!
शहरातील जवाहरनगर चौकात गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे पाहून, पालकमंत्री डॉ. पाटील यांनी मनपाच्या अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. शहरातील रस्त्यांवरून गटाराचे वाहणारे पाणी आणि खड्डे ही बाब यापुढे खपवून घेतली जाणार नाही, त्यासाठी निधी कमी पडत असेल तर, तसे सांगावे, शासनाकडून निधी मिळवून देणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
*पालकमंत्र्यांसह अधिकारी रस्त्यावर!
शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले असून, या समस्येच्या मुद्यावर अनेकदा नागरिकांकडून तक्रारी आणि रस्त्यांवर उतरून आंदोलन केले जाते. त्यानुषंगाने शहरातील रस्ते, सांडपाणी समस्येच्या मुद्यावर पालकमंत्री डॉ.पाटील रस्त्यावर उतरून त्यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी केले. पालकमंत्री रस्त्यावर उतरल्याने मनपा अधिकार्यांनाही रस्त्यावर उतरावे लागले.