अकोला: भाजप-शिवसेना युतीच्या कालावधीत शहरात सिमेंट काँक्रिटचे रस्ते निर्माण करणार्या प्रतिभा कन्स्ट्रक्शनने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीला सोमवारपासून सुरुवात झाली. मुंबई येथे आर.बी. ट्रेडर्स लवादसमोर होणार्या सुनावणीला खुद्द मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर उपस्थित होते. सन २००१ मध्ये मनपाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत महापालिकेवर भाजप-शिवसेनेचा भगवा फडकला होता. त्यावेळी शहरातील प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय सत्तापक्षाने घेतला. १६ कोटींच्या अनुदानातून १६ रस्ते तयार करण्याचा भाजप-सेनेचा मानस होता. सदर काम प्रतिभा कन्स्ट्रक्शनला देण्यात आले. संबंधित कंपनीने १६ पैकी आठ रस्त्यांचे निर्माण करीत हात वर केले. त्यामुळे मनपानेसुद्धा कंपनीला पूर्ण देयक अदा केले नाही. या मुद्यावर प्रतिभाने प्रशासनाच्या विरोधात मुंबईस्थित आर.बी. ट्रेडर्स लवादाकडे याचिका दाखल करीत मनपावर १६ कोटीचा दावा ठोकला. सन २००७ पासून लवादकडे प्रलंबित असलेल्या या प्रकरणी तीन वर्षांपूर्वी आर.बी. ट्रेडर्सच्यावतीने शहरातील आठ रस्त्यांची पाहणी केली. त्यावेळी प्रतिभा कन्स्ट्रक्शनच्यावतीने निकषांची पूर्तता केली नसल्याचे लवादच्या निदर्शनास आले होते. या प्रकरणी नोव्हेंबर २०१३ मध्ये नागपूर येथे तत्कालीन सत्तापक्षातील पदाधिकारी व अधिकार्यांचे बयान नोंदविण्यात आले. प्रतिभानेच नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका प्रशासनाच्यावतीने ठेवण्यात आला. या प्रकरणी सोमवारपासून आर.बी. ट्रेडर्स लवादच्या समोर सुनावणीला प्रारंभ झाला आहे. सोमवारी पार पडलेल्या सुनावणीला मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासह शहर अभियंता अजय गुजर उपस्थित होते. ** उद्या पुन्हा सुनावणीसोमवारी लवादासमोर दोन टप्प्यात सुनावणी झाली. यामध्ये सकाळी ११.३० ते दुपारी १ पर्यंत तसेच दुपारी ३ ते ४.३० पर्यंत सुनावणी झाली. उद्या सकाळी पुन्हा सुनावणीला सुरुवात होईल.
प्रतिभाच्या याचिकेवर सुनावणी सुरू
By admin | Updated: May 12, 2014 22:24 IST